वसई /खानिवडेः वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडी आणि मित्रपक्ष मिळून 71 जागी दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण 115 जागांपैकी 66 जागांवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून, बविआसोबत युती करून लढलेल्या काँग्रेसला 4 आणि मनसेला 1 जागा पदरी पाडून घेता आली. या निवडणुकीत परिवर्तनाचा नारा देणाऱ्या भाजपाने 43 जागा, तर शिवसेना (शिंदे गट) 1 जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत 95 जागा स्वतंत्रपणे लढवणाऱ्या उबाठा सेना आणि 13 तेरा जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षांना एकही जागा मिळवता आलेली नाही.
गेल्या विधानसभेतील बविआच्या पराभवानंतर महापालिका ताब्यात घेण्याची भाजपाने मोठी महत्त्वकांक्षा बाळगली होती. त्यादृष्टीने शिवसेनेशी महायुती करीत भक्कम व्युहरचना भाजपकडून राबविण्यात आली. बविआ, काँग्रेस आणि मनसे यांनी एकत्रित आघाडी करून निवडणूक लढली. त्याचा काँग्रेस आणि मनसेला फायदा झाला. या विजयासह वसईविरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला गड यशस्वीपणे राखत पुन्हा एकदा पक्षाची ताकद सिद्ध केली आहे. अनेक प्रभागांमध्ये चारच्या पॅनलने विजय मिळवत बविआने वर्चस्व प्रस्थापित केले.
वसई-विरार महापालिकेच्या यंदाच्या तिसऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित करण्यात बहुजन विकास आघाडीला यश मिळाले असले, तरी मावळत्या महापालिकेत भाजपचे असलेले एका नगरसेवकाचे बलाबल यावेळी वाढून तब्बल 43 झाले आहे. पक्षाची ताकद वाढली असली, तरी असलेल्या संधीच्या तुलनेत मोठा पल्ला महायुतीला गाठता आलेला नाही. मुख्यमंत्र्यांची जाहीरसभा घेण्यापासून ते अन्यही राजकीय कुरघोडया करणाऱ्या भाजपा शिवसेना महायुतीला अपेक्षित असलेली वर्षभरापूर्वीच्या विधानसभा निवडणुकितील मतदानाची पुनरावृत्ती या निवडणुकीत करून घेता आलेली नाही.
गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत महापालिकेतील भ्रष्टाचार, बोकाळलेली अनाधिकृत बांधकामे आणि रस्त्यांसह अन्यही नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा यामुळे जनता राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा-शिवसेनेवर नाराज होती, असाच संकेत या निवडणुकीतील निकालातून मिळतो.
सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार महापालिका क्षेत्रात कार्यरत असताना, त्यांना या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. आयत्यावेळी आयारामांना झालेले उमेदवारीच्या खैराती वाटप आणि त्याचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते, तथा नाराजात उमटणारे पडसाद आणि दोन्ही भाजपच्या आमदारांमधील समन्वयाचा असलेला अभाव वेळोवेळी दिसून येत गेल्यामुळे जनता आणि मतदारांवर त्याचा नकारात्मक परिणाम झालेला दिसून येते आहे. याउलट माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विधान सभा पराभवाची निराशा झटकून, हाती कोणतीही सत्ता नसताना या निवडणुकीत एकहाती गाठलेले यश दैदीप्यमान ठरते.
नवघर माणिकपूर शहरातील भाजपचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते शेखर धुरी आणि यापूर्वी पालिकेत पक्षाचा एकमेव असलेला माजी नगरसेवक किरण भोईर यांना उमेदवारी नाकारून पक्ष नेतृत्वाने स्वतःच्या पायावर पहिली कुऱ्हाड मारली. परिणामी या दोघांनीही बंडखोरी केली. त्याचा फायदा बहुजन विकास आघाडीने उचलत राजकीय कुरघोडी केली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शेखर धुरी यांना बहुजन विकास आघाडीमध्ये दाखल करून घेत, प्रभाग 26-ड मधून उमेदवारीही बहाल केली.
विशेष बाब म्हणजे, भाजपात तीस वर्षाहून अधिक काळ ज्यांच्या खांद्याला खांदा लावून शेखर धुरी यांनी काम केले. त्या भाजपचे निष्ठावान पदाधिकारी, तथा उमेदवार उत्तमकुमार नायर यांच्याशी धुरी यांची लढत होऊन, त्यात धुरी विजयी सुद्धा झाले. प्रचार काळात त्यांनी भाजपाच्या आमदार आणि विद्यमान नेतृत्वावर प्रखर टीका करून पक्षाच्या निवडणूक कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. या बाबीचा फटका पक्षाला सर्वच ठिकाणी बसल्याचे दिसून येते.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत पूर्ण समन्वय आणि सहमती शिवाय निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे या महायुतीमध्ये सावत्रपणाचा दुरावा प्रचार काळातही आणि मतदानाच्या दिवशीही जाणवत राहिला. या बाबीचा समर्थक मतदारांवरही प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. वर्षभरापासून पक्षात येते गेलेले आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरही पक्षात आलेल्या अनेक बऱ्या-वाईटांना उमेदवारीचे कार्पेट अंथरले गेले. या बेरजेच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही पक्षाशी एकनिष्ठ राहून, पक्षवृद्धी आणि विस्तारासाठी झटणाऱ्या निष्ठावंतांकडे दुर्लक्ष होत गेले.
आमचा कार्यकर्ता जिंदाबाद! - आमचा कार्यकर्ता जिंदाबाद! हा माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि त्याने प्रभागा प्रभागातून घेतलेल्या मेहनतीचा विजय आहे. आम्ही शंभरी पार केली असती, पण मतदारांची नावे गहाळ होणे, इव्हिएम मशीन स्लो चालणे, मतदार यादीतील नावे लांबच्या भलत्याच मतदान केंद्रावर दर्शवली जाने आदी मतदार याद्यांतील घोळामुळे कमी जागा मिळाल्या.हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष : बविआ
पहारेकऱ्याची चोख भूमिका बजाऊ - एका नगरसेवकावरून आम्ही 44 वर आलो असल्याने समाधानी आहोत. केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही, तर सत्ताधाऱ्यांना विकासाच्या मुद्द्यावर सहकार्य करून महापालिकेत पहारेकऱ्याची चोख भूमिका बजावू. शहर विकासासाठी आवश्यकतेप्रमाणे राज्य आणि केंद्र शासनाचीही मदत पालिकेसाठी मिळवून देऊ, आमचे सर्व नगरसेवक जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असतील.राजन नाईक, आमदार : नालासोपारा