पालघर : हनिफ शेख
सध्या मोखाडा तालुका आणि परिसरात दररोज समाज माध्यमांद्वारे आणि चौका चौकात एकच चर्चा पहावयास मिळते ते म्हणजे आज बिबट्या इथे दिसला उद्या बिबट्या तिथे दिसला. याबद्दलच्या चकाट्या मारल्या जात आहेत. एवढेच काय तर आता ए आय टेक्नॉलॉजीमुळे अनेक बिबट्यांचे फोटो जोडले जाऊन गावागावात बिबट्या घुसल्याचे जणू एक प्रकारे यातून दाखवले जात आहे.
खरंतर मोखाडा शहरापासून जवळ असलेल्या वारगड पाळा परिसरात एक बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. यानंतर सर्व चक्र फिरली आणि वनविभागाच्या म्हणण्यानुसार एक बिबट्या निश्चितच आहे तर अजून एखादा बिबट्या असू शकतो. मात्र वारघडपाडा, मोरखडक, साखरी या भागात त्याचा वावर आहे. तो एका जागेवर थांबत नाही, असेही वन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र सध्या तालुक्यातील समाजमाध्यमावर अनेक ठिकाणचे बिबट्याचे फोटो व्हायरल होत आहे. मात्र ही सुद्धा कला एआयने साधल्याचे सिद्ध होत आहे. काही नेटकऱ्यांनी समाज माध्यमावरच त्याची पोलखोल सुद्धा केल्याची दिसून आले. मात्र एकूणच या बिबट्यांच्या चर्चांमुळे मोखाडा शहर आणि परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
अगदी महिला भगिनी, लहान मुले या सर्वांच्या तोंडात आता या बिबट्यांच्याच चर्चा रंगलेल्या दिसून येतात. बिबट्या कॅमेरात कैद व्हावा किंवा बिबट्याची माहिती ग्रामस्थांना मिळावी, यासाठी मोखाडा वन विभागाकडून वारगड पाडा या भागात एआय तंत्रज्ञानाचा कॅमेरा व सायरन देखील बसविण्यात आला आहे. याशिवाय बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील आणल्याचे सांगण्यात येत आहे.तर रात्रीच्या वेळी वन विभागाच्या वाहनातून सावधानतेचा संदेश देऊन जनजागृती देखील करण्यात येत आहे.
एकीकडे वनविभागाचे असे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र काही खोडकर व्यक्तींकडून एआयचा वापर करून अनेक गाव पाड्यात बिबट्या शिरल्याचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत. तर नुकताच मोखाडा-खोडाळा रस्त्यावरील देवबांध पुलावर बिबट्या दिसल्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाला. काहींनी बहुसंख्य लोकांना सावध करावे, म्हणून अधिक व्हयरल केले.तर काही नेटकऱ्यांनी हा खोटा फोटो असल्याचे सांगत काही पुरावे देखील याबाबत दाखवून दिले. यामुळे या फोटोची समाज माध्यमावर चांगलीच चर्चा रंगली.
असाच एका दुसऱ्या फोटोची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली त्यामध्ये बिबट्या गावात शिरल्याचे दाखविण्यात आले. काहींनी बिबट्या असा नसतो हा चिता असल्याचे सांगितले. त्यामुळे तो चिता की बिबट्या यावरच अधिक चर्चा रंगली. मात्र तो फोटोही एआय केलेला असल्याचे समोर आले. यामुळे एकीकडे वनविभाग ओरिजनल बिबट्यांच्या शोधत आहे तो बिबट्या अद्यापही सापडत नसल्याने सर्व अधिकारी कर्मचारी हैराण आहेत. त्याच्यातच एआयने बिबट्यांची संख्या अधिक वाढविली आहे.
जंगलातील बिबटे, फोनवरील बिबट्यांपासून सावधान
मोखाडा शहराजवळ काही दिवसापूर्वी एका बिबट्याचे दर्शन झाले आणि तिथूनच मोखाडा वन विभाग सावध झाले. मात्र यानंतर अमुक विहिरीपाशी दिसला अमुक गावात घुसला अमुक पुलावर उभा होता. तर तमुक झाडावरच दिसला अशा चर्चांना उधाण आले. तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची देखील धावपळ उडाली. मात्र एक बिबट्या निश्चित असून दुसऱ्या बिबट्यांची बाबत खात्रीशीर माहिती वन विभागाकडे नाही. मात्र सोशल मीडियावर यायच्या माध्यमातून फोटो बनवून मोखाडा तालुक्यात आतपर्यंत पाच ते सात बिबट्या आणि त्यांची ठिकाणे बदललेली दिसून येतात.
यामुळे एकीकडे लोकांमध्ये घबराट असताना दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नेटकऱ्यांनी या अफवांमध्ये अजून खतपाणी घातले आहे. यामुळे जंगलातील बिबटे आणि फोनवरील बिबटे या दोन्ही बिबट्यांपासून सावधान राहण्याची गरज मोखाडावासियांना निर्माण झाली आहे.
आम्ही वारघडपाडा याठिकाणी एआय तंत्रज्ञानाचा कॅमेरा लावला आहे. याशिवाय बिबट्या आल्यास वाजणारा सायरन देखील लावण्यात आला आहे. शिवाय आमचे कर्मचारी भोंग्याद्वारे जनजागृती करीत आहेत. एक बिबट्या असल्याची खात्री आहे. मात्र अजून एखादा असू शकतो असा अंदाज आहे. खोटे फोटो देखील खूप व्हायरल होत आहेत. यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, मात्र सावध रहा!विनोद दळवी, वनक्षेत्रपाल, मोखाडा वनविभाग