आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी सुद्धा शेकडो रुग्णांना जिल्ह्यातून स्थलांतर करावे लागत असल्याने ही मोठी शोकांतिका आहे. Pudhari News Network
पालघर

मोठी शोकांतिका ! रोजगाराबरोबरच आता आरोग्य सुविधांसाठीही स्थलांतर

पालघरच्या आदिवासीबांधवांना उपचारासाठी नाशिक, वापी, सिल्वासाचा घ्यावा लागतोय आधार

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे

  • वर्षानुवर्षापासून आदिवासी बांधव, गोरगरीब रुग्णांची आरोग्य व्यवस्थेसाठी आर्त हाक

  • जागतिक पातळीवरचे प्रकल्प सुरु : मात्र हा विकास नेमका कोणासाठी, प्रश्न उपस्थित

पालघर (ठाणे) : हनिफ शेख

जव्हार मोखाडा याप्रमाणे पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याचे चित्र आहे मात्र आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी जिल्हा असावा अशी घोषणा करत २०१४ साली ठाणे जिल्हा विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली.

एकही सुसज्ज रुग्णालय नाही

त्यामुळे आता तरी सरकारी यंत्रणा आमच्या दारापर्यंत पोहोचून आमचा विकास करेल आमचं जगणं सुखकर होईल अशी अपेक्षा येथील आदिवासी तसेच गोरगरीब नागरिकांना वाटत होती, मात्र पोटापाण्यासाठीचे स्थलांतर तर आहेच त्यावर उपाययोजना सोडाच मात्र आता आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी सुद्धा या भागातील शेकडो रुग्णांना जिल्ह्यातून स्थलांतर करावे लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आजही मोठ्या आजारांवरील उपचारासाठी एकही सुसज्ज रुग्णालय नाही.

याशिवाय मोठ्या आजारांबरोबरच जिकरीची प्रसुती यासाठी सुद्धा यंत्रणा नसल्याने अनेकदा जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागातील नागरिकांना नाशिक रुग्णालयाचा सहारा घ्यावा लागत आहे. डहाणू तलासरी पालघर या भागातील नागरिकांना आजही वापी सिल्वासाचा किंवा थेट गुजरात या ठिकाणी जाऊन उपचार करावे लागत आहेत. तर वसई भागातील नागरिक थेट ठाणे मुंबई गाठताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा निर्मिती होऊन दहा वर्षे झाल्यानंतर सुद्धा स्थानिक पातळीवर उपचार करणारी यंत्रणा नेमकी कधी तयार होईल हा खरंतर संशोधनाचा भाग आहे.

अनेकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील विविध विभागाच्या मंत्र्यांकडून पालघर हे तिसरी मुंबई होण्याच्या मार्गावर असल्याच्या वल्गना करताना दिसतात याचे कारणही तसेच आहे. या भागातून जाणारी बुलेट ट्रेन या भागात होणार वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ, असे अनेक जागतिक पातळीवरचे प्रकल्प या भागात होताना दिसत आहेत. यांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र दुसरीकडे आजही माता मृत्यू, बालमृत्यू, कूपोषण, उपचार मिळण्याआधीच होणारे मृत्यू, दवाखान्यापर्यंत सुद्धा न पोहोचणारे जीव, रुग्णालयात गेलेच तर उपलब्ध नसणारी आरोग्य यंत्रणा अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे खराब झालेल्या रुग्णवाहिका असे चित्र दिसून येते.

Thane Latest News

विकास नेमका कोणासाठी ?

हा विकास नेमका कोणासाठी हा ज्वलंत प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. मुळात पालघर जिल्हा झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय आणि त्या खालोखाल गेल्या कित्येक वर्षापासून नुसती चर्चा असलेले जव्हार येथे एक उपजिल्हा रुग्णालय यांची निर्मिती युद्धपातळीवर होणे आवश्यक होते. मात्र ते झाले नाही. यात विविध प्रकल्पाचे काम असेल त्याला सुरुवातीपासूनच नागरिकांनी विरोध केला तरीही लोकांचा विरोध डावलून हे प्रकल्प जोरात सुरू आहेत मात्र दुसरीकडे वर्षानुवर्षे येथील आदिवासी बांधव, गोरगरीब रुग्ण आम्हाला चांगली आरोग्य व्यवस्था स्थानिक पातळीवर द्या अशी आर्त हाक देत आहेत, मागणी करत आहे त्यांच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT