विरार : नालासोपारा येथे ७ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पेल्हार पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून अल्पवयीन आरोपी फरार झाला आहे. शुभम वर्मा (वय ३०) असे संशयित आरोपीचे नाव आहे. नालासोपारातील सामुहिक लैंगिक अत्याचाराची महिन्याभरात ही सातवी घटना आहे.
पीडित मुलीला मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास आरोपी शुभम वर्मा आणि १४ वर्षीय मुलाने नालासोपारा धानीवबाग येथील एका गल्लीतील गाळ्यात नेले. वर्मा याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला तर दुसऱ्याने त्या प्रसंगाचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रण केले. हा प्रकार पीडित मुलीने घरी येऊन आपल्या आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने तात्काळ पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५ (२), ७७ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वन कोटी यांनी सांगितले. मागील महिन्याभरात नालासोपारा परिसरात सामूहिक लैंगिक अत्याचाराची ही सातवी घटना आहे. यापैकी चार गुन्हे आचोळे पोलीस ठाण्यात, दोन गुन्हे तुळींच पोलीस ठाण्यात तर एक गुन्हा पेल्हार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.