Leopard File Photo
पालघर

Leopard Attack: डहाणूत बिबट्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू; माटगावमध्ये घटना

शेतातून घरी परतताना झडप ; पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

डहाणू: पालघर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळील माटगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतातील काम आटोपून घरी परतणाऱ्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला.

बिबट्याने त्यांना फरफटत नेत मानेचा चावा घेतल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विक्रमगड तालुक्यातील सारशी गावच्या रहिवासी तुलसी सावर (६५) या गेल्या अनेक वर्षांपासून चंडीगाव परिसरातील बळवंत राऊत यांच्या वाडीत राहून मजुरीचे काम करत होत्या. माटगाव येथील वाडीत काम आटोपून घरी परतत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली.

घटनेची माहिती मिळताच शेतमालक बळवंत राऊत आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता.

बोईसर वनपरिक्षेत्रातील वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात बिबट्याचा वावर वाढला आहे.

पाळीव कुत्रे आणि गायींच्या वासरांवर हल्ल्याच्या घटनाही घडत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वनविभागाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप माटगाव मधील ग्रामस्थांनी केला आहे.

मानवावर हल्ला झाल्यानंतरच माहिती द्यावी, असे वनविभागाकडून सांगितले जात असल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला. नागरिकांचा बळी गेल्यानंतरच वनविभागाला जाग येणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

...अन्यथा आक्रोश मोर्चाचा इशारा

परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याचा शोध घ्यावा, तातडीने पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे आणि नियमित गस्त सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाने त्वरित कारवाई न केल्यास शेतकरी आणि सर्वपक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT