50,000 seedballs planted on Ambernath's Cohosh Forest Hill
अंबरनाथ : पुढारी वृत्तसेवा
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बदलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत अंबरनाथ कोहोज गाव वन टेकडीवर अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ५० हजार सीडबॉलचे रोपण करण्यात आले. यावेळी ठाणे व रायगड जिल्ह्याच्या विविध भागातील अनिरुद्ध बापूंच्या अनुयायांनी विविध स्थानिक प्रजातीच्या बियांपासून ५० हजार हन अधिक सिडबॉल तयार केले.
सिडबॉल रोपणासाठी वनविभागाच्या मदतीने अंबरनाथ तालुक्यातील कोहोज गावच्या मोहन नॅनो इस्टेट या गृहप्रकल्पामागे असलेल्या विस्तीर्ण अशा राखीव वनक्षेत्राची निवड करण्यात आलेली होती. यावेळी विविध वयोगटातील २०० पेक्षा अधिक महिला व पुरुष अनिरुद्ध बापूंच्या अनुयायांनी सहभाग नोंदवून वनपरिक्षेत्र अधिकारी बदलापूर संजय धारवणे व वनपरिमंडळ अधिकारी अंबरनाथ वैभव वाळिंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० हेक्टर परिसरात ५० हजार सिडबॉलचे रोपण केले. यावेळी जंगल परिसरात सिडबॉल रोपणाचे काम करताना साप व इतर वन्यजीवांपासून सहभागी नागरिकांच्या संरक्षणासाठी थठठ संस्थेचे स्वयंसेवक व आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टर, नर्स यांचेही पथक तैनात करण्यात आले होते.
विकासासोबतच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून प्रत्येकाने पर्यावरणासाठी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी बदलापूर संजय धारवणे यांनी केले.
नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संवर्धनाची आवड निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचे उपक्रम फायदेशीर असल्याबाबत मत सहभागी नागरिकांनी व्यक्त केले.https://www.youtube.com/watch?v=7O6WTjG39O0
बीज अंकुरणासाठी सध्या पोषक वातावरण असल्याने सिडबॉलमधील बीज अंकुरण यशस्वी होऊन त्यापासून रोपेनिर्मितीची टक्केवारी निश्चितच चांगली राहील.- वैभव वाळिंबे, कनपरिमंडळ अधिकारी अंबरनाथ.