Dahanu News Pudhari
पालघर

Dahanu News: डहाणूतील कृषी विद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवलं जीवन; कारण अद्याप अस्पष्ट

वाणगाव पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

डहाणू: डहाणू तालुक्यातील वाणगाव परिसरातील आसनगाव येथील एका वसतिगृहात १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. संबधित विद्यार्थिनीने वसतिगृहात आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर विद्यालय परिसरात खळबळ उडाली.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वाणगाव पोलिसांकडून या घटनेचा विविध शक्यतांच्या आधारे तपास सुरू आहे.

संबधित तरुणी ही मूळची जव्हार येथील असून, आसनगाव येथे पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी ती विद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्यानंतर विद्यालय प्रशासनाकडून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच वाणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबधित तरुणीने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

तरुणीवर कोणत्याही प्रकारचा दबाव होता का, आत्महत्येपूर्वी तिचा कोणाशी संपर्क झाला होता का, तसेच तिच्या वैयक्तिक किंवा शैक्षणिक जीवनात काही अडचणी होत्या का, या विविध बाबींच्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू आहे.

या तपासाचा भाग म्हणून विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच तिच्या कुटुंबीयांकडूनही माहिती घेतली जात आहे. तपासातूनच तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान वसतीगृह, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांबाबत गेल्या काही दिवसात अनेक घटना समोर येत असून ही बाब चिंतेची ठरत आहे.

विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज

वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अवघ्या १९व्या वर्षी तरुणीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक अडचणींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमित समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही या घटनेनंतर पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT