पालघर : क्रिकेट खेळायला गेलेल्या सहा मुलांपैकी एक 17 वर्षीय मुलगा सातपाटी समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेल्याची घटना घडली. उमेद इमरान शेख असे सातपाटी मुस्लिम मोहल्ला येथे राहणाऱ्या या मुलाचे नाव असून त्याला वाचवायला गेलेले त्याचे पाच मित्र मात्र या घटनेतून बचावले आहेत. खेळायला गेल्यानंतर समुद्राचा मोह आवरेनासा झाल्याने ही तरुण मंडळी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. त्यानंतर ही घटना घडली.
समुद्राला मोठी भरती असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे पोलिसांसमोर निर्माण झाले. स्थानिक मच्छीमार या मुलाचा शोध घेत आहेत. आज पालघर जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रचंड वेगवान वारी त्यातच समुद्राला मोठी भरती आल्याने मोठमोठ्या लाटा समुद्रात होत्या. शिरगाव सातपाटी दरम्यान समुद्रकिनारी क्रिकेट खेळायला गेलेल्या या सहा मुलांना पोहोण्याचा मोह झाला. समुद्राच्या महाकाय लाटांमध्ये या सर्व मित्रांनी उड्या घेतल्या. मात्र या लाटांच्या तडाख्यात सापडल्याने उमेद हा वाहून गेला. मित्रांनी वाचविण्याचा केलेला प्रयत्नही अयशस्वी ठरला.
घटना घडल्याची माहिती मिळतात सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने समुद्रकिनारी दाखल झाले. स्थानिक मच्छीमार व गावातील तरुणांसह इतरांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र समुद्राच्या मोठ्या लाटांसमोर हे प्रयत्न तोकडे पडले. तब्बल चार तास उमेदचा शोध घेण्यात आला. मात्र त्याचा शोध न लागल्यामुळे ही शोध मोहीम थांबवली गेली. ओहोटी लागल्यानंतर किंवा पाणी ओसरल्यानंतरच त्याचा शोध घेणे सोयीस्कर ठरणार होते. त्यामुळे स्थानिक व त्याचे नातेवाईक ओहोटीची वाट पाहत होते.