पालघर : हनिफ शेख
आजघडीला पालघर जिल्हा देशातील सर्वात मोठ्या विकास प्रकल्पांचे केंद्र बनत असताना दुसरीकडे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागांमध्ये आजही पावसाळा हा जीवघेणा संघर्ष ठरत आहे. जुलै ते ऑक्टोबर या ४ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ७८ गावांमधील तब्बल ११२ पाड्यांचा बाह्य जगाशी संपर्क तुटणार असून या भागांतील १८२ गर्भवती महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळा सुरू होताच पालघर जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमधील आरोग्य व्यवस्थेची खरी परीक्षा सुरू होते. जिल्ह्यातील तब्बल ७८ गावांमधील ११२ पाड्यांचा संपर्क जुलै ते ऑक्टोबर दरम्यान तुटण्याची शक्यता असून या भागांमध्ये राहणाऱ्या १८२ गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसूती, माता-बाल आरोग्य आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात रस्ते, पूल आणि ओढे पाण्याखाली जात असल्याने अनेक पाड्यांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क पूर्णपणे खंडित होतो. परिणामी आरोग्य सेवा, औषधोपचार, लसीकरण तसेच आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होते. याच काळात जिल्ह्यात कुपोषण, माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना वाढण्याची शक्यता आरोग्य विभागासाठी मोठे आव्हान ठरते. कारण जेव्हा मोखाडा तालुक्यातील अशा अनेक घटना ताजी आहेत.
यातीलच मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडी येथील घटनेने पूर्ण राज्य हादरले होते त्या ठिकाणी आज शासनाकडून नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे तर कुरलोद येथील देखील एका गर्भवतीने पाण्याच्या उंडक्यावर प्रवास केल्याची देखील घटना समोर आल्यानंतर त्या ठिकाणी शासनाकडून तातडीने बोटिंगच व्यवस्था केली होती यंदा देखील पावसाळ्यात ११२ ससंपर्कहीन पाड्यांतील १८२ गर्भवती महिलांची सुरक्षितता, माता-बाल आरोग्याचे संरक्षण आणि आपत्कालीन आरोग्य सेवा वेळेत पोहोचविणे हीच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोरील सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात अनेक गर्भवती महिलांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी खांद्यावर डोली करून अनेक किलोमीटरचा प्रवास करत रुग्णालयात नेल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी पूल नसल्याने किंवा रस्ते वाहून गेल्याने महिलांना जीव धोक्यात घालून नदी-नाल्यांमधून नेण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात वेळेत उपचार न मिळाल्यास माता आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपर्क तुटणाऱ्या भागांतील प्रत्येक गर्भवती महिलेवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.
संपर्कहीन पाड्यांमधील नागरिकांसमोर केवळ प्रसूतीच नव्हे तर सर्पदंश, अतिसार, ताप, मलेरिया, डेंग्यू, अपघात आणि इतर आपत्कालीन आरोग्य समस्यांचेही मोठे संकट उभे राहते. रुग्णवाहिका त्या भागात पोहोचू शकत नसल्याने अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. जिल्ह्यात १०८ आणि १०२ रुग्णवाहिका सेवा कार्यरत असल्या तरी रस्ताच नसल्यास या सेवा निष्प्रभ ठरतात. परिणामी अनेक गावांमध्ये स्थानिक साधनांवर अवलंबून राहण्याची वेळ येते.
जिल्ह्यातील बाकी तालुक्यांपेक्षा पावसाळ्यामध्ये गावांचा संपर्क तुटण्याची अधिकची संख्याह मोखाडा तालुक्यातून दिसून येत होती. मात्र या घटनानंतर ज्या पद्धतीने समाज माध्यमातून प्रसिद्धी माध्यमातून या घटनांना प्रसिद्धी मिळाली त्याची दखल शासन स्तरावरून घेण्यात आल्याचे दिसून येते यातूनच मर्कटवाडी सारख्या पाड्यापर्यंत डांबरी रस्ता पोहोचला आहे तर कुर्लोद येथील पूल देखील झाल्याने त्या ठिकाणीही आता गावांचा संपर्क तुटणार नसल्याचे सकारात्मक चित्र आहे.
प्रशासनाच्या पूर्वतयारीची कसोटी
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून संपर्कहीन गावांची यादी तयार केली जाते. उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची नोंद, आरोग्य तपासणी, आवश्यक औषधसाठा आणि काही महिलांना प्रसूतीपूर्व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया राबविली जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अपुरी पायाभूत सुविधा, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे प्रशासनासमोर मोठी आव्हाने उभी राहतात.
पुढील तीन महिन्यात गर्भवती आणि प्रसूती होणाऱ्या मातांचा चार्ट तयार करून त्यावर काळजीपूर्वक लक्ष दिले जाणार आहे. प्रत्येक मातेला आरोग्य संस्थेअंतर्गत जोडले जाणार असून माहेरघर योजनेमधून त्यांची वैयक्तिक काळजी घेतली जाणार आहे. याशिवाय माता आणि सोबतीला राहणाऱ्या व्यक्तीला देखील बुडीत मजुरी देण्यात येणार आहे.डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी,पालघर.