Raj Thackeray Pudhari
महाराष्ट्र

Operation Sindoor: पाकिस्तान आधीच बरबाद देश, युद्ध हे काही उत्तर नाही- राज ठाकरे

Raj Thackeray On India Pakistan War: राज ठाकरे म्हणाले, पहलगामला जो हल्ला झाला त्यावेळीच मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केला त्यांना धडा शिकवला पाहिजे.

पुढारी वृत्तसेवा

MNS Chief Raj Thackeray On Operation Sindoor

मुंबई : भारताच्या संरक्षण दलांनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर देशभरातील राजकीय पक्षांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. पाकिस्तान हा आधीच बरबाद झालेला देश आहे, त्या देशाला तुम्ही आणखी काय बरबाद करणार, एअरस्ट्राईक करून लोकांना भरकवटणे हे काही उत्तर होऊ शकत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

भारतीय सैन्याने बुधवारी मध्यरात्री 1 वाजून 05 मिनिटे ते दीड वाजेपर्यंत अशा 25 मिनिटांत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. सैन्याने जैश- ए- मोहम्मद, लष्कर- ए- तोयबा अशा दहशतवादी संघटनांच्या प्रमुख तळांनाच लक्ष्य केले. देशभरातून या कारवाईचं समर्थन होत आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार अशा सर्वच नेत्यांनी 'जय हिंद' म्हणत सैन्याच्या Operation Sindoor या कारवाईला पाठिंबा दर्शवला.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले, पहलगामला जो हल्ला झाला त्यावेळीच मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केला त्यांना धडा शिकवला पाहिजे. हा धडा इतका कठोर असला की पुढच्या पिढींनाही तो लक्षात ठेवायला हवा.

'दहशतवादी हल्ल्याचं उत्तर हे युद्ध नसतं. अमेरिकेत ट्विन टॉवर पाडले म्हणून त्यांनी युद्ध नाही केलं. त्यांनी दुसऱ्या देशाात जाऊन फक्त दहशतवाद्यांना ठार मारलं. दुसऱ्या देशात युद्धात परिस्थिती आणायची, मॉक ड्रील घ्यायची, सायरन वाजवायचे. याऐवजी मूळात ही गोष्ट का घडली याचा विचार केला पाहिजे. अजून आपण दहशतवाद्यांना शोधू शकलेलो नाही, ज्या पर्यटनस्थळावर हल्ला झाला तिथे आधीपासूनच सुरक्षा का नव्हती, आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन राबवून अशा लोकांना हुडकून काढणे गरजेचं आहे', अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.

'हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करा. मॉक ड्रीलपेक्षा देशभरात कोम्बिंग ऑपरेशन राबवा. आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाही. अशा परिस्थितीत आपण युद्धाला सामोरे जाणं हे योग्य नाही. नाकानाक्यावर अमली पदार्थ मिळतायंत. लहान मुलंही व्यसनाधीन होतायंत. हे सगळं कुठून येतंय हे शोधलं पाहिजे. हे आत्ताचे गंभीर प्रश्न आहेत. युद्ध हे काही त्याचं उत्तर नाही. तुम्ही नक्की काय पाऊल उचलतायंत हे महत्त्वाचं', असंही राज ठाकरेंनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT