नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; येथील हॉस्पिटलसमोर एका डॉक्टरवर कोयत्याने हल्ला करून लूटमार केल्याप्रकरणी तिघांना अटक केली असून, एक संशयित फरार आहे. दरम्यान, आणखी एका घटनेत नाशिकरोड पोलिसांनी एका संशयिताला अटक करीत त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
बुधवारी (दि.८) रात्री ८ च्या सुमारास बिटको हॉस्पिटलसमोर डॉ. ओंकार पाटील हे मोबाइलवर बोलत असताना दोन दुचाकीवरून चौघे संशयितांनी शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. डाॅ. पाटील यांनी विरोध केला असता एकाने कोयत्याने हल्ला करत त्यांच्या खिशातील रोकड काढून पलायन केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून प्रणव प्रदीप इंगळे (रा. गांधीधाम, देवळाली गाव), शाहिद सय्यद (रा. शेख मंजिल टाउन हॉल शेजारी, सत्कार पॉइंट, देवळाली गाव) व यज्ञेश ऊर्फ ज्ञानेश्वर शिंदे (रा. सुभाष रोड, नाशिकरोड) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कोयता व रोख रक्कम जप्त केली आहे. तर, चौथा संशयित कलाम मन्सुरी अद्याप फरार आहे. तसेच आणखी एका घटनेत मालधक्का रोडजवळील तक्षशिला शाळेजवळ संशयितरीत्या फिरणाऱ्या शैलेश गोपीचंद सहारे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस तसेच मोबाइल आढळून आला. त्याची चौकशी केली असता तो रेवगडे चाळ, साई मंदिरजवळ, पाटील गॅरेज पाठीमागे राहत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.