उत्तर महाराष्ट्र

जालन्यातील छापेमारीनंतर नाशिकमधील स्टील उद्योजकांचे धाबे दणाणले

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्राप्तीकर खात्याकडून जालना जिल्ह्यातील स्टील व भंगार व्यावसायिकांकडील तब्बल 390 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील स्टील आणि भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, कर चुकवेगिरी करणार्‍या नाशिकमधील व्यावसायिकांवरही प्राप्तीकर खात्याकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आयकर विभागाने जालना आणि औरंगाबाद परिसरात छापे टाकत 10 दिवस प्राथमिक तपासणी केली. यामध्ये जालन्यातील काही स्टील आणि भंगार व्यापारी बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट घेत असल्याचे निदर्शनास आले. या इनपूट टॅक्स क्रेडिटचा वापर करून संबंधित व्यापार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात करबुडवेगिरी सुरू होती. आयकर विभागाने या करबुडवेगिरी करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी मोहिमेची व्यवस्थित आखणी करून छापे टाकले. या छापेमारीत आयकर खात्याचे मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील तब्बल 260 कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, आयकर विभागाने ही मोहीम अधिक वेगवान करताना अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि फायली जप्त केल्या आहेत. तसेच स्टील कंपन्यांच्या कार्यालयाची झाडाझडती अद्यापही सुरूच आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध स्टील कंपन्यांना आणि छोट्या-मोठ्या उद्योजकांना लागणारा रोख रकमेचा पुरवठा केलेल्या आर्थिक व्यवहाराचीही तपासणी केली जात आहे.

लोखंडी सळ्यांचे उत्पादन करणार्‍या उद्योगांची पंढरी असलेल्या जालन्यातून नाशिकसह सबंध राज्य आणि देशभरात स्टील, लोखंडी सळ्यांचा पुरवठा केला जातो. नाशिकमधील बहुतांश उद्योग जालन्यातून होणार्‍या स्टील पुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे जालन्यातील आणि नाशिकसह इतर जिल्ह्यातील उद्योजकांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची आयकर विभागाकडून तपासणी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या स्टील कंपन्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळली, त्या कंपन्यांकडून इतर कंपन्यांशी रोखीतच आर्थिक व्यवहार केले जात होते. ही बाब पुढे आल्यास, करबुडवेगिरी करणार्‍यांमध्ये अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता असल्याने, नाशिकमधील काही उद्योजकांचेही धाबे दणाणले आहेत.

दरम्यान जालन्यातून स्टील आयात करणार्‍या काही स्थानिक उद्योजकांकडे सद्यस्थितीत पुरेसा स्टॉक असल्याने, उद्योग सुरळीत ठेवण्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. पुढच्या काही दिवसांचा स्टॉक शिल्लक असून, हे प्रकरण लवकर संपेल, अशी अपेक्षाही उद्योजकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर जे करबुडवे आहेत, त्यांना याचा परिणाम भोगावा लागेल, असेही काही उद्योजकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

पुन्हा स्टील महागणार
स्टील दरवाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने, ते केव्हा वाढतील, याची काहीच शाश्वती नसते. अशात स्टीलचा पुरवठा करणार्‍या जालना जिल्ह्यातच मोठी कारवाई केली गेल्याने, त्याचा परिणाम स्टील उत्पादनांसह पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास स्टीलचे दर पुन्हा वाढण्याची भीतीही काही उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे. अनेकांनी जालन्यातील स्टील उद्योजकांकडून स्टीलचा व्यवहार करताना सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आहे, हादेखील परिणाम स्टील दरवाढीवर होईल, असे बोलले जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT