जळगाव : पुढारी वृत्तसेवा
आजारातून बरे होण्यासाठी जडीबुटीचे औषध देण्याच्या बहाणा करून 3 लाख 13 हजार रुपये घेऊन विवस्त्र फोटो काढून 1 लाख 68 हजारासाठी ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागत असलेल्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, सुनिल मडकू पाटील (वय ४४, रा. पारोळा जि. जळगाव) यांना किरकोळ आजार होता. आजारापासून दिलासा मिळावा म्हणून त्यांनी भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे एका रस्त्यावर औषधाचा विनापरवाना कॅम्प लावणाऱ्या संशयित आरोपी सुरजसिंग राजूसिंग चितोडीया (रा. केसरनगर, भुसावळ) याला भेटून औषधांबाबत विचारणा केली. आपल्याकडे चांगल्यापध्दतीचे औषध आहे असे सुरजसिंगने सांगितले. त्यानंतर बोगस जडीबुटी देवून त्याने सुनिल पाटील यांच्याकडून 3 लाख 12 हजार वेळोवळी पैसे घेतले. फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सुनिल पाटील यांनी औषध घेणे बंद केले. त्यानंतर संशयित आरोपीने अश्लिल फोटो पाठवून धमकी देत अजून 1 लाख 68 हजाराची मागणी केली. याप्रकाराला कंटाळून सुनिल पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान संशयित आरोपी हा भुसावळ शहरात असल्याचे गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी सुरजसिंग राजूसिंग चितोडीया याला अटक केली. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.