नाशिक : चंद्रमणी पटाईत
माझ्या कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर', 'काळ ऐसा चालून येवे, लिहिता लिहिता प्रतापसिंग जावो', 'घरा-घरा मधी दिलं स्वाभिमानी जीणं, हेच काम केलं इथे भीमजयंतीनं', गुलमोहरी रूपाच्या भीमाला, साजनी गुलमोहरी मिळाली', 'दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर', 'भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ' अशी अनेक भन्नाट आणि अजरामर गाणी लिहून, संगीतबद्ध करून आणि आपल्या पहाडी आवाजात घराघरांत पोहोचवत आंबेडकरी चळवळीला गतिमान करणारे प्रतापसिंग (दादा) बोदडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील कवी, गायकांचा मार्गदर्शक तर हरपलाच, परंतु महाकवी वामनदादा कर्डक यांच्या समकाळातील एका पर्वाचा हा अंत मोठी पोकळी निर्माण करून गेला आहे.
महाकवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य अशी ख्याती प्रतापसिंग (दादा) बोदडे यांची होती. एम.ए. (इंग्रजी) असे शिक्षण असलेले प्रतापसिंग दादा रेल्वेत क्लर्क पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर दादांनी अनेक रचना पुढे आणल्या. भारदस्त आणि कव्वाली बाज असलेल्या आवाजातून त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर आणि शिवरायांच्या विचारांची पेरणी केली. आयुष्यभर चळवळीशी बांधिलकी जपणारा ऊर्जस्वर गायक म्हणून ख्याती प्राप्त केली. नव्या पिढीला लिखाण कसे असावे, आपले काव्य व्यंगावर नव्हे, तर विचारावर प्रसूत झाले पाहिजे, आपल्या शब्दांची धार बोथट होऊ नये यासाठी उदयोन्मुख गायक-कवींना वाचनाचा सल्ला देतानाही दादा अत्यंत वडिलकीच्या भावनेने डोक्यावरून मायेने हात फिरवून सांगत. बोदवड, मुक्ताईनगरपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दादा 'भीमराज की बेटी मैं तो जयभीमवाली हूँ' या गीताच्या माध्यमातून पोहोचले. स्त्रियांमध्ये स्वाभिमान पेरणारे हे गीत अजरामर ठरले. वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप आदींच्या पिढीतील हा हिरा निखळल्याने चळवळ पोरकी झाली हे मात्र, निश्चित. भाषणाकडे पाठ फिरविणार्यांना एका आलापाने आणि बुलंद शायरीने विचारमंचाकडे खेचून आणण्याची ताकद दादांमध्ये होती. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व असल्याने चपखल शब्द मांडण्यात दादांचा हातखंडा होता. पुरोगामी आणि परिवर्तनाचा वसा अखेरपर्यंत दादांनी जपला. कुशल कर्म करून महानिर्वाणाच्या वाटेवर चालण्याचा संदेशही दादांनी दिला. आपल्या लेखणीने विद्रोह पेरणारा, मनुवादी व्यवस्थेशी लढणारा, नसानसांत फुले-शाहू-आंबेडकर जागवणारा अवलिया आज जगातून निघून गेला आहे. निर्मिकाने या शाहिरास नेण्याची जरा घाईच केली. आता प्रतापसिंग केवळ शरीराने या जगातून गेले असले तरी काव्यरुपाने, विचाराने ते सदैव आपल्यातच हे मात्र नक्की. प्रतापसिंग दादांनी लिहिलेली, संगीतबद्ध केलेली गाणी पुढील काळातही प्रत्येकाच्या मनावर राज्य करतील आणि परिवर्तनाच्या वाटेतील सर्वांचा दिशादर्शक ठरतील.