उत्तर महाराष्ट्र

स्केल नव्हे, ‘स्किल’ डाउनने केला घात

अंजली राऊत

निमित्त : सतीश डोंगरे 

विधी शाखेच्या द्वितीय वर्षाचे निकाल समोर आले अन् विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या, विद्यापीठात निवेदने अन् तक्रारी धडकल्या. मात्र, या सर्व प्रकारांवर विद्यापीठाने 'स्केल डाउन' हे एकच उत्तर देऊन निकालावरून विद्यार्थ्यांकडून सुरू असलेला आक्रोश निरर्थक ठरवला. खरे तर एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, तेव्हा विद्यापीठासह महाविद्यालयस्तरावर मंथन होणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठासह महाविद्यालयांनी देखील विद्यार्थ्यांवरच खापर फोडल्याने, विद्यार्थी सध्या तणावाच्या गर्तेत आहेत. वास्तविक या सर्व प्रकाराला 'स्केल' डाउनचे गुळगुळीत नाव दिले जात असले, तरी वस्तुत: शिक्षकांच्या 'स्किल' डाउनमुळेच विद्यार्थी अनुत्तीर्णतेचा टक्का वाढला आहे, हे देखील विसरून चालणार नाही.

कोरोना महामारीत ऑनलाइन शिक्षणपद्धती पुढे आली. अर्थात ही पद्धत आपल्या शैक्षणिक पद्धतीला मारक ठरणारी होती. अनेकांनी ही पद्धत शिक्षणाचा नायनाट करणारी असल्याचा सूर व्यक्त केला होता, तर काहींनी याकडे संधी म्हणून बघितले, हेदेखील नाकारून चालणार नाही. याची प्रचिती म्हणून ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांनी गुणांचे इमले बांधले. दहावी-बारावीत जेमतेम गुण मिळवणारे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये झळकले. विशेष बाब म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विधीचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत शिकवला जातो, असे असतानाही विद्यार्थी ८० ते ९० टक्के गुण घेऊ लागले. अनेकांना या काळात पदवी मिळवण्याचे स्वप्न साकार करता आले. कोरोना महामारीने सर्वत्र नकारात्मकता निर्माण केली असताना, शिक्षण क्षेत्रात मात्र सर्व काही 'हॅप्पी-हॅप्पी' असल्याचे बघावयास मिळाले. मात्र, हा आनंद फार काळ टिकणे अशक्य होते. कारण महामारी सौम्य होताच ऑनलाइन परीक्षा पुन्हा पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांसमोरही ऑफलाइन परीक्षेचे आव्हान होतेच. त्यात वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे, आपल्या महाविद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखणे, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे आदींसाठी शिक्षकांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार होती. यामध्ये दुर्दैवाने बहुतांश शिक्षक अपयशी ठरले. अनेकांनी अभ्यासक्रम शिकवण्याच्या नावे टंगळमंगळ करण्यावर भर दिला. काहींनी ऑनलाइन परीक्षेचे कवित्व गाताना, आता ऑफलाइन परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हाल, असे प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांचे खच्चीकरण केले. अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. शिक्षकांनी अर्धवट शिकवल्याने अनेकांनी डिजिटल माध्यमांचा आधार घेऊन कन्सेप्ट समजून घेतल्या. काहींनी नोट्सचा आधार घेतला. पुढे पेपर उत्तम प्रकारे सोडवले. मात्र, जेव्हा अनुत्तीर्णतेचा निकाल हाती पडला, तेव्हा अनेकांना मोठा धक्का बसला.

याबाबतचा जाब विचारणे क्रमप्राप्त असल्याने, अनेक विद्यार्थी सध्या महाविद्यालय स्तरावर यावरून भांडत आहेत. काहींनी विद्यापीठातही याबाबतचे तक्रार अर्ज केले आहेत. संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. मात्र, विद्यापीठाने स्केल डाउनचे उत्तर देऊन या प्रकरणाला वेगळीच हवा देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठ ज्या स्केल डाउन नियमाचा हवाला देत आहे, त्यामध्येही अनेक त्रुटी असल्याने विद्यापीठाने अगोदर हा नियम व्यवस्थित समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिक्षकही आपल्या 'स्किल डाउन'वर बोट न ठेवता, 'स्केल डाउन'चा आधार घेत असल्याने विद्यार्थीच आता बुचकळ्यात पडले आहे. त्यामुळे पुढच्या काळात शिक्षकांनी आपल्या 'स्किल'वर भर देऊन गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा हीच माफक अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT