जळगाव : पुढारी वृत्तसेवा: विरोधकांकडून मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे. मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत, ईडी, सीबीआय अशा सगळ्या चौकशी लावल्या आहेत. कर नाहीतर डर कशाला, तुम्हाला जेवढं खोदायचंय खोदा, मात्र काही मिळणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज (दि.२७) जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह सर्व माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खडसे म्हणाले की, आता सीबीआय चौकशी सुरु केली आहे, सगळ्या चौकशा लावल्या आहेत, जर काही केलं नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही, एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही खोदा जेवढं खोदायचं आहे तेवढं, मात्र काही मिळणार नाही, हे सरळ लढू शकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी आ. खडसे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. सरकार असताना अनेकदा त्यांची भेट घेतली, मात्र न्याय मिळाला नाही, अशी खंत व्यक्त केली. अनेकांनी सांगितलं की सरकार असताना मला न्याय मिळत नाही, काही अंशी हे खरंच आहे, तुमचा अनुभव असेल, जयंतरावांचाही अनुभव हाच आहे. माझाही अनुभव हाच आहे, शरद पवार, अजित पवार, जयंतराव, मी मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतरही बऱ्याच वेळा भेट घेतली. मात्र न्याय मिळाला नाही, अशी खंत व्यक्त केली. मी टीका करत नाही, परंतु हे साधारण चालतं, सर्वांचं समाधान करेल, असा माणूस अजून जन्माला यायचाय, तो अजून जन्माला आलेला नाही, त्यामुळे सरकार कोणाचंही असलं, तरी समाधान होतं असं नाही, कार्यकर्त्यांची स्वाभाविक इच्छा असते की माझ्या नेत्याने माझं ऐकलं पाहिजे, माझ्या नेत्याने सरकारमध्ये असताना माझं काम केलं पाहिजे, असं खडसे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या, क्रियाशील कार्यकर्ते आपल्या भागात तयार करा, आपापसातील वाद बंद करा आणि आपली संघटना मजबूत करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
'५० खोके, एकदम ओके' अशा आशयाचे टी शर्ट छापून त्याचे प्रत्येक मतदारसंघात वाटप करण्यात यावं, अशा सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. या सूचनांचं जयंत पाटील यांनी कौतुक करत अशा पद्धतीनेच स्थानिक पातळीवर रान पेटवायला सुरुवात केली पाहिजे, असं आवाहन केलं आहे. तसंच आजी-माजी सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले तर राज्याचं चित्र बदलू शकतं, असंही जयंत पाटील म्हणाले.