नाशिक | ऑगस्टमध्येही १११ टँकरचा फेरा सुरूच Pudhari Photo
नाशिक

नाशिक | ऑगस्टमध्येही १११ टँकरचा फेरा सुरूच

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणपातळीत वाढ झाली. विविध धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग ही केला गेला. पण, जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ८६ गावे व ३७१ वाड्यांची पाणीटंचाई 'जैसे थे' आहे. या ठिकाणी १११ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू आहे.

जून व जुलै महिन्यात पावसाने जेमतेम हजेरी लावल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. अवघे तीन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलस्तरात लक्षणीय वाढ झाली. विशेष करून पश्चिम पट्ट्यातील धरणे भरल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, एकीकडे पावसाने झोडपून काढले असताना पूर्व पट्टयातील मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, सिन्नर तसेच बागलाण या तालुक्यात अद्यापही भूजल पातळी सुधारलेली नाही. विहिरींना पाणी उतरलेले नाही. त्यामुळे दोन लाख ३० हजार ३०५ लोकसंख्येला १११ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या दिवसभरात २७३ फेऱ्या होत आहेत.

बागलाण व सिन्नर तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी २२ टँकर सुरू आहेत. मालेगाव तसेच नांदगावला प्रत्येकी १९ टँकरचा फेरा सुरू असून, येवल्यात १७ व चांदवडला १२ टँकर धावत आहेत. तसेच पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने ९४ विहिरींही अधिग्रहित केल्या आहेत. दरम्यान, चालू आठवड्यात टँकर सुरू असलेल्या तालुक्यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर आवश्यक नसेल तेथील टँकर बंद करण्यात येतील, असे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT