नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या गट, गण प्रारूप आराखड्यावर प्राप्त झालेल्या 64 हरकतींवर गुरुवारी (दि.7) विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासमोर सुनावणी झाली आहे. यावेळी उपस्थितीत अर्जदारांचे तक्रार, म्हणणे ऐकूण घेण्यात आले. अनुपस्थित अर्जदारांच्या हरकती फेटाळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त सर्व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता येत्या 18 ऑगस्टला गट, गणाची प्रभागरचना अंतिम होणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी नव्याने गट, गण आराखडा जाहीर करण्यात आल्या नंतर निर्धारित कालावधीत जिल्ह्यातील 15 तालुक्यांतून एकूण 64 हरकती प्राप्त झाल्या होत्या. सर्वाधिक हरकती निफाड तालुक्यात 19, त्या खालोखाल नाशिक 13, मालेगाव तालुक्यातील 13 होत्या. याशिवाय चांदवड 5, देवळा 3, नांदगाव 3, सिन्नर व सुरगाणा येथे प्रत्येकी 2, तर त्र्यंबक, येवला, पेठ आणि कळवण येथून प्रत्येकी एक हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. इगतपुरी, दिंडोरी आणि बागलाण या तालुक्यांतून कोणतीही हरकती प्राप्त झालेली नव्हती.
प्राप्त हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या सर्व हरकती अभिप्रायासह 28 जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या आहेत. त्यावर गुरुवारी (दि. 7) दिवसभर सुनावणी घेण्यात आली. उपस्थितीत अर्जदारांकडून हरकतींवर सविस्तर म्हणने ऐकूण घेतले.
विशेष म्हणजे सीमा निश्चितींच्या सर्वाधिक हरकती होत्या. त्यामुळे गावे-वाड्या यांचा समावेश करू नये अशी अर्जदारांनी मागणी यावेळी केल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हरकती निकाली काढल्यानंतर गट-गण रचनेचा अंतिम प्रारूप आराखडा 18 ऑगस्टला अंतिम होईल. त्यानंतर हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या या गट, गण प्रारूप आराखड्याकडे लक्ष लागले आहे.