nashik zilla parishad  
नाशिक

ZP teacher promotions-आचारसंहिता संपताच झेडपीत पदोन्नतीची लॉटरी!

४२९ शिक्षक, मुख्याध्यापकांना 'गिफ्ट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली पदोन्नतीची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली ही प्रक्रिया आचारसंहिता संपताच वेगाने मार्गी लागली असून, जिल्ह्यातील तब्बल ४२९ शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे.

शिक्षण विभागाने २३ ते २५ जून या तीन दिवसांच्या कालावधीत ही पदोन्नती आणि समुपदेशन प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली. समुपदेशनाद्वारे संबंधितांची संमती घेतल्यानंतर त्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित करण्यात आले असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे राबवली.

या प्रक्रियेत गणित, विज्ञान आणि भाषा विषयांच्या पदवीधर शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे. तसेच अनेक शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी (वर्ग-३) या पदांवर बढती देण्यात आली आहे. खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १२२ शिक्षकांनीही केंद्रप्रमुख पदाची पदोन्नती मिळवली आहे

ना वाद, ना तक्रार

शिक्षण विभागातील झालेल्या पदोन्नती, पदस्थापना प्रक्रिया पार पडल्यानंतर कायमच वाद, तक्रारी होतात. अनेकदा आर्थिक देवाण-घेवाण झाल्याच्या देखील तक्रारी झालेल्या आहेत. मात्र, यंदा झालेल्या पदोन्नती प्रक्रियेनंतर कोठेही वाद झाला नाही, कोणावरही अन्याय झाल्याची तक्रारदेखील प्राप्त झाली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविली.

)

अशा मिळाल्या पदोन्नती (एकूण ४२९ लाभार्थी)

१९६ : भाषा विषयाचे पदवीधर शिक्षक (इयत्ता सहावी ते आठवी)

१२२ : खात्यांतर्गत परीक्षेतून केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळालेले शिक्षक

६३ : प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यातून केंद्रप्रमुखपदी बढती

२९ : गणित व विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक

१९ : शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यातून बनलेले विस्तार अधिकारी (वर्ग-३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT