नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांबाबत अखेर प्रशासन बॅकफुटवर आले असून, अन्याय झालेल्या बदल्यांमध्ये अशंत बदल करण्याची प्रशासनाने तयारी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शुक्रवारी (दि. 6) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विभाग प्रमुखांना पत्र काढत, झालेल्या बदल्यांची पडताळणी करून 24 तासांत अहवाल मागविला आहे. शनिवारी (दि. 2) दुपारी दोन वाजेपर्यंत हा अहवाल सादर करण्याची डेटलाईन देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने राबविलेल्या बदली प्रक्रियेसंदर्भात मित्तल यांच्या समवेत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (दि.5) बैठक झाली. बैठकीत, जि. प. कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बदली प्रक्रियेत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. शासन आदेश बासनात गुंडाळून कशा बदल्या झाल्या हे निदर्शनास आणून दिले. पेसा तालुक्यातील सक्तीने झालेल्या बदल्यांबाबतही यावेळी तक्रारी झाल्या. त्यामुळे अनियमित झालेल्या बदल्यांमध्ये दुरुस्त्या करण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. मित्तल यांनी सर्व तक्रारी एेकूण घेत, बदल्यांमध्ये अशंत: बदल केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार मित्तल यांनी शुक्रवारी सकाळी विभागप्रमुखांना पत्र काढले. यात आप-आपल्या विभागातील संवर्गाच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांची केलेली कार्यवाही पुन्हा पडताळणी करून पाहावी. प्राप्त झालेल्या तक्रारींवर प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रियेत काही अनियमिता झालेली आहे की नाही याबाबत प्रकरणनिहाय तपासून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी पत्रात दिले आहे.
दरम्यान, मित्तल यांनी विभागप्रमुखांना थेट बदल्यांची तपासणी सूची तयार करून दिली आहे. या सूचीत कर्मचा-यांचे नाव, पदस्थापना कार्यालयाचे नाव, मुख्यालयात कधीपासून कार्यरत आहे तो दिनांक, वर्ष, महिना, 31 मे झालेली एकूण सेवा, बदलीने दिलेली पदस्थापना, बदलीस पात्र आहे की नाही, नसल्यास कारण, बदली योग्य झाली आहे की नाही, योग्य नसल्यास कारणे अशी माहिती मागविली आहे.
ज्या विभागप्रमुख यांनी बदली प्रक्रीया राबविली आहे , ती चुकीची आहे, अनिमयमित झाली आहे असे ते कसे सांगू शकतील. त्यामुळे त्यांच्याकडूनच ही पडताळणी कशी होणार असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.