नाशिक : विकास गामणे
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत अनेक गट महिला राखीव झाले आहेत. गट महिला राखीव झाल्यामुळे आता इच्छुक नेत्यांची मोठी पंचाईत झाल्याने, नेत्यांनी होम मिनिस्टरला निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने गटाची चाचपणीदेखील सुरू केली आहे. दिवाळीचे निमित्त करत, अनेक नेत्यांनी होम मिनिस्टरचे ब्रॅण्डिंग केले. त्यात नेमके कोणत्या होम मिनिस्टर मिनी मंत्रालयात पोहोचतात याकडे लक्ष लागले आहे.
साडेतीन वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटातून रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक जोरदार तयारीत होते. त्याकरिता इच्छुक नेते सण असो की, उत्सव याचे निमित्त करत लोकांमध्ये होते. परंतु आरक्षण सोडतीमध्ये अनेक गट महिला राखीव झाले. गट महिला राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या नेत्यांची अडचण झाली. मात्र, या नेत्यांनी या अडचणीवर मात करत, आपल्या सौभग्यवतींना पुढे केले आहे. जिल्ह्यातील डझनभराहून अधिक नेत्यांनी, 'मी नाही, तर सौ' असे सूत्र तयार करत आपल्या होम मिनिस्टरांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.
बागलाण तालुक्यातील नामपूर गट हा सर्वसाधारण स्त्री झाल्याने माजी सभापती यतींद्र पाटील यांची पत्नी मनीषा पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ब्राह्मणगाव गट राखीव झाल्याने येथून इच्छुक असलेले प्रशांत (पप्पू तात्या) बच्छाव यांची अडचण झाली. त्यामुळे त्यांच्या पत्नी वर्षा बच्छाव निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. देवळा तालुक्यातील उमराणे गट महिला राखीव झाल्याने येथून जि.प.चे माजी उपाध्यक्ष विश्वास देवरे यांच्या पत्नी तथा माजी सदस्य प्रशांत देवरे यांच्या मातोश्री कमल देवरे ह्या उमेदवारी करतील.
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही हा गट ओबीसी महिला झाला असल्यामुळे येथून डाॅ. आत्माराम कुंभार्डे आपल्या पत्नी डाॅ. शिल्पा कुंभार्डे, गणेश निंबाळकर यांच्या पत्नी, नितीन गांगुर्डे यांच्या पत्नी रिंगणात उतरू शकतात. धोडांबे गट महिला राखीव असल्यामुळे येथून माजी उपाध्यक्ष डाॅ. सयाजी गायकवाड यांच्या पत्नी डाॅ. विजया गायकवाड, मनोज शिंदे, काका काळे, विलास भवर यांच्या कुटुंबातील महिला रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. नांदगाव तालुक्यातील साकोरा व जातेगाव गट महिला राखीव झाले आहेत. त्यामुळे साकोरा गटातून रमेश बोरसे, महेंद्र बोरसे, अमित बोरसे यांच्या कुंटुंबीयांतील महिला रिंगणात उतरू शकतात, तर जातेगाव गटातून ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या पत्नी व तेज कवडे यांच्या मातोश्री माजी सभापती शोभाताई कवडे यांची उमेदवारी होऊ शकते.
येवला तालुक्यातील अंदरसूल गटातून विद्यमान सदस्य महेंद्र काले यांच्या पत्नी, साधना काले, मकरंद सोनवणे यांच्या पत्नी सुवर्णा सोनवणे, किसन धनगे यांच्या पत्नी मंदाकिनी धनगे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. महिला राखीव झालेल्या निफाड तालुक्यातील विंचूर गटातून माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या पत्नी विद्यमान सदस्य किरण थोरे, डी. के. जगताप यांच्या पत्नी माजी सभापती सुवर्णा जगताप, होळकर कुटुंबीयांतील सोनिया होळकर, पांडुरंग राऊत यांच्या पत्नी सविता राऊत, तर ओबीसी महिला राखीव झालेल्या उगाव गटातून माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पत्नी मुक्ताताई क्षीरसागर अन्यथा त्यांच्या भावजयी माधुरी संजय क्षीरसागर, राजेंद्र डोखळे यांच्या पत्नी वर्षा डोखळे, चांदोरी ओबीसी महिला राखीव गटातून सिद्धार्थ वनारसे यांच्या पत्नी संगीता वनारसे, महिला राखीव झालेल्या सायखेडा गटातून गोकुळ गिते यांच्या पत्नी उज्ज्वला गिते, नरेंद्र गिते यांच्या पत्नी दीपाली गिते, संदीप डेरले यांच्या कुटुंबातील महिला रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
सिन्नर तालुक्यातील माळेगाव महिला राखीव गटातून संजय सोनवणे, प्रकाश कदम, वाल्मीक शेळके यांच्या कुटुंबातील महिला रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ओबीसी महिला राखीव झालेल्या दापूर गटातून माजी अध्यक्षा शीतल सांगळे पुन्हा नशीब आजमावू शकतात.