नाशिक जिल्हा परिषद  Pudhari News Network
नाशिक

Zilla Parishad Nashik | नाशिक जिल्हा परिषदेचा राज्यात तिसरा क्रमांक

Nashik News । 100 दिवस आराखडा : 75.43 टक्के गुण; लोकाभिमुख प्रशासन संकल्पनेला मूर्त स्वरूप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या 100 दिवस कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. याबाबतचा कार्यमूल्यमापन अहवाल महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केला. त्यामध्ये जिल्हा परिषदेने 100 पैकी 75.43 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

राज्य शासनाने विविध निकषांवर जिल्हा परिषदांची मूल्यांकन प्रक्रिया राबवली होती. यात जिल्हा परिषदाने संकेतस्थळ विकास, केंद्र शासनाशी सुसंवाद, स्वच्छता अभियान, तक्रार निवारण व्यवस्था, कार्यालयीन सुविधा, प्रशासकीय सुधारणा, अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षण, आर्थिक प्रोत्साहन योजना, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि कामकाजातील पारदर्शकता अशा 10 प्रमुख बाबींमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत 'लोकाभिमुख प्रशासन' या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले आहे. यामध्ये अनुकंपा अ‍ॅप, घरकुल योजना चॅटबोट, आरबीएसटीएस प्रणाली, इंटलेजंट वर्क, मॅनेजमेंट सिस्टीम, अंगणवाड्यांचे 100 टक्के विद्युतीकरण, पेसा- अ‍ॅप, बीआरसी कनेक्ट अ‍ॅप, जल जीवन मिशन तक्रार निवारण अ‍ॅप, ई- सुनावणी, हजेरी प्रणाली या उल्लेखनीय नवकल्पनांचा समावेश केला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकांशी सुसंवाद वाढला आहे. सर्व विभागांत डिजिटल व कार्यक्षम प्रणालींचा अवलंब करून निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान आणि उत्तरदायी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमांतर्गत सर्व विभागप्रमुख व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतल्याच्या प्रयत्नांचे फलित मिळाले आहे. जि.प.च्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी लोककेंद्रित, पारदर्शक सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, हा सन्मान आम्हाला पुढील कामकाजासाठी निश्चितच बळ देणारा आहे.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT