नाशिक : जिल्हा परिषदेच्या नियमित बदल्या प्रक्रियेत गोंधळ असताना मुख्यालयातंर्गत केलेल्या अतंर्गत बदली प्रक्रियेतही अनियमिता झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. एका विभागात काम केलेले असतानाही एका कर्मचाऱ्यांस पुन्हा तो विभाग देण्यात आला आहे.
सेवाज्येष्ठता यादीत नावे असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे सभागृहात अचानक गायब झाली. तर, सभागृहात रिक्त पदे दाखवली नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे या बदल्यांही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त तीन वर्षे व एका विभागात जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येईल, असा शासन आदेश आहे. त्यानुसार अंतर्गत बदल्या होणे आवश्यक असते. यासाठी प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी नियमित बदली प्रक्रियेनंतर ही प्रक्रियादेखील पार पाडली. यात तब्बल 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आठ वरिष्ठ सहाय्यक तर, 27 कनिष्ठ सहाय्यकांचा यात समावेश आहे. मात्र, या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहे. बांधकाम दोनमधील पकंज सोनवणे यांची बदली आरोग्य विभागात करण्यात आली. मात्र, सोनवणे यांनी यापूर्वी आरोग्यात नियोजन टेबल प्रतिनियुक्तीवर सांभाळलेला आहे. असे असतानाही त्यास पुन्हा आरोग्य देऊन नियोजनचा टेबल देण्याचा घाट घातला जात आहे.
बदल्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या सेवा ज्येष्ठता यादीत अशोक आहिरे यांचे नाव दाखविले गेले. प्रत्यक्षात सभागृहात बदलीच्या वेळी त्यांचे नाव गायब झाले. विभागीय आयुक्त कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले विजय घोलप यांचे नाव यादीत घेतले जाते. प्रत्यक्षात त्यांची बदली केली जात नाही. बदली करायची नसते तर, त्यांचे नाव यादीत कशासाठी असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थितीत केला आहे. भास्कर कुंवर यांची बांधकाममध्ये बदली झाली मात्र, त्यांना लागलीच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पीए पदावर बसविण्यात आले. त्यांच्याकडे कोणताही अनुभव नसताना येथे नियुक्ती कशी असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून देखील कर्मचाऱ्यांना बदल्यांमध्ये सूट देण्यात आलेली नाही. अतंर्गत बदल्यांमध्ये रिक्त जागा पूर्ण दाखविल्या गेल्या नसल्याचा आरोपही संघटनांकडून होत आहे.
बदली प्रक्रियेत सामान्य प्रशासन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या तत्पतेबद्दल आता शंका उपस्थितीत होऊ लागल्या आहेत. 30 एप्रिल रोजी रिक्त झालेल्या सहायक प्रशासन अधिकारी पदावर पेठ येथील कर्मचाऱ्यास तात्काळ नियुक्ती देऊन कर्मचारी दिला गेला. मात्र, बांधकाम विभाग दोनसह काही तालुक्यात सहायक प्रशासन अधिकारी तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदे रिक्त आहेत मात्र, प्रतिक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना या नियुक्त्या दिल्या जात नसल्याने विभागातील कामकाजाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
बांधकाम विभाग दोनमधील बनावट निविदा प्रकरणामुळे विभागातील तीन कर्मचारी निलंबीत केले आहे. या जागी अतंर्गत बदल्यांमध्ये कोणालाही नियुक्ती दिली नाही. याउलट अतंर्गत बदली बदली तसेच नियमित बदल्यांमध्ये या विभागातील सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत या विभागातील पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुख्यालयातच असमतोल साधला गेल्याची चर्चा आहे.