नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात एकतर्फी व एकाधिकारी पद्धतीने राबविण्यात आलेल्या बदल्यांची प्रक्रिया अखेर प्रशासनाच्या अंगलट आली. आदेश झुगारून, नियमबाह्य पद्धतीने केलेल्या ३७ ग्रामसेवकांच्या बदल्या रद्द करण्याची नामुश्की ग्रामपंचायत विभागावर ओढवली. यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी तातडीने पत्र काढून संबंधित ग्रामसेवकांना पूर्ववत ठिकाणी कार्यमुक्त केले असल्याचे जाहीर केले आहे.
दि. १५ ते १७ मे दरम्यान जिल्हा परिषदेतील सुमारे ७०० कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया एकाधिकारपणे पार पडल्याची जोरदार टीका होत आहे. समुपदेशनाच्या नावाखाली बदल्या केल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात ना रिक्त पदांची माहिती देण्यात आली, ना कर्मचाऱ्यांना पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले.
दिव्यांग, पती- पत्नी एकत्रीेकरण, विधवा, परित्यक्ता, कुमारिका, गतिमंद बालक - पालक, दुर्धर आजारग्रस्त व ५३ वर्षांहून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांचे सर्वच निकष पायदळी तुडवून बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अनेक ग्रामसेवकांना हटवण्यात आले, तर काहींवर अन्याय झाला. या अन्यायाविरोधात ग्रामसेवकांनी आवाज उठविला, पण तो प्रशासनाने दडपण्याचा प्रयत्न केला. या बदल्यांविरोधात काही ग्रामसेवकांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केल्या तसेच विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडेही तक्रारी दाखल करण्यात आल्या. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या. परिणामी ग्रामपंचायत विभाग बॅकफूटवर गेला असून, अखेर ३७ बदल्यांवर पुनर्विचार करून त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, ११ कर्मचारी हे ५३ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असूनही त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, तर १७ कर्मचारी दिव्यांग असूनही त्यांनाही बदल्यांच्या फे-यात अडकवण्यात आले. आता त्या बदल्या रद्द करून न्याय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे भासवले जात आहे.
बदल्यांतील अन्याय समोर आल्यानंतर, संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचेही स्पष्ट होत आहे. विनंती बदल्यांच्या प्रक्रियेत ३५ बदल्यांची नोंद दाखवण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात ४५ बदल्यांचे आदेश निघाले. या 10 अतिरिक्त बदल्या कधी आणि कुठे केल्या गेल्या, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उदाहरणादाखल, लासलगाव ग्रामपंचायत बदल्यांच्या यादीत नसताना, प्रत्यक्षात तिथे ग्रामसेवकाची बदली करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण बदल्यांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.