नाशिक : जिल्ह्यात मान्सून कालावधीत आरोग्य विभागाचे साथरोग, पूरपरिस्थिती, अतिवृष्टी नियोजनासाठी १ जूनपासून प्रतिबंधनात्मक उपाययोजना अंतर्गत मान्सून नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात यावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
जून महिन्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित सर्व विभागांना मान्सून तयारी आराखडा सादर करण्याचे आदेश दिलेले असल्याने हे आराखडे सादर करावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी दिले. जिल्हा प्रशासनाकडून संबंधित विभागांना मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करत अलर्ट राहण्याच्या सूचनादेखील त्यांनी यावेळी दिल्या.
यासंदर्भात डॉ. बागूल यांनी शुक्रवारी (दि. 9) जिल्हास्तरीय 15 तालुक्यातील विस्तार अधिकारी व आरोग्य सहायक यांची बैठक घेतली. जि. प. आरोग्य विभागातंर्गत 113 प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि उपकेंद्र 592 मध्ये विशेष साथरोग वैद्यकीय पथके, जिल्हास्तरीय दोन, प्रती तालुकास्तरीय एक आणि एक शिगहत प्रतिसाद पथक स्थापना करण्यात आले आहे. समवेत 108 रुग्णवाहिका, आणि प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिका या सक्षम कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर 24 तास कॉल सेंटर सुरू करण्यात आला आहे. संभाव्य पुरामुळे बाधित होऊ शकणा-या गावांमध्ये संभाव्य पूरपरिस्थिति नियंत्रण पथके कार्यन्वित करण्यात आले आहे. १जूनपासून सुरू होणाऱ्या मान्सून कालावधीत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन सर्वेक्षण करून जलजन्य आणि कीटकजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. साथरोगाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधनात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना, घरगुती उपाययोजना व घ्यावयाची काळजी याचे आरोग्य शिक्षण हे नागरिकांना देण्यात येणार आहे.
मान्सून नियंत्रण कक्षाची स्थापना करून १ जूनपासून सुरू होणार.
जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, शीघ्र प्रतिसाद विशेष वैद्यकीय पथके तैनात
आपत्कालीन सेवा व सल्ल्यासाठी २४ तास कॉल सेंटर सुरू
जलजन्य व कीटकजन्य आजारांचा वेळीच शोध.
प्रतिबंधात्मक उपाय व घ्यावयाची काळजी.