नाशिक : बांगलादेशींच्या समस्येवर झिरो टॉलरन्सची भूमिका महायुती सरकारने घेतली आहे. महसूल आणि पोलिस यंत्रणा समन्वयाने काम करून या विषयावर युद्धपातळीवर उपाययोजना राबवित आहे. बांगलादेशी नागरिक कोलकाता येथे आधार व पॅनकार्ड तयार करून महाराष्ट्रात प्रवेश करतात, ही समस्या जुनी असली, तरी महायुती सरकार त्यावर कठोर पावले उचलणार असल्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यमंत्री कदम यांनी पदभार सांभाळल्यानंतर मंगळवारी (दि. २८) नाशिकला प्रथमच भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी शहरातील पोलिस यंत्रणेचे गुन्हेगारी नियंत्रण तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. मंत्री कदम म्हणाले की, नाशिकमध्ये ड्रग्जचा प्रचार व प्रसार करणाऱ्या आणि ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस यंत्रणेला दिले आहेत.
तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत. चेनस्नॅचिंग घटना थांबवण्यासाठी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना दिली. याशिवाय, शहरात रिक्षांची संख्या अधिक आहे, मात्र त्या प्रमाणात रिक्षाथांबे नाहीत. प्रवाशांच्या सुविधेसाठी रिक्षा थांबे तयार करण्याचे निर्देशही पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक शहर महसूल संकलनात आघाडीवर आहे, मात्र, शहराच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाबरोबरच गुन्हेगारीतही वाढ होत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. शहरातील ड्रग्ज रॅकेट मोडीत काढण्यासाठी पोलिसांच्या विशेष मोहिमेवर भर दिला जाईल. तसेच चेनस्नॅचिंगच्या 250 घटनांपैकी प्रमुख दोन टोळ्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारीत लहान मुलांचा वाढता सहभाग गंभीर चिंतेचा विषय असून, या समस्येवर विशेष दक्षता मोहिमेद्वारे उपाययोजना करण्यात येईल. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, सध्या सिग्नल यंत्रणांचे नियंत्रण पोलिसांकडे नाही. ते मिळाल्यास वाहतूक अधिक सुरळीत होईल. याशिवाय, आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय कक्षविस्ताराला प्राधान्य दिले जाईल. यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.