सिडको : मित्राबाबत माहिती विचारण्याच्या कारणावरून तरुणाचे अपहरण करून त्याला कोयता व फायटरने मारहाण केल्याची घटना अंबड परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हुमेर हुसेन शेख (वय २२, रा. स्कायलार्क अपार्टमेंट, मदीना नगर, वडाळागाव, नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फिरदोस कॉलनी, अंबड येथे नमाज पठणासाठी गेले होते. नमाजानंतर सोहेल नावाच्या युवकाने त्यांना थांबवून हाशिम खान याच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलणे करून दिले. त्यानंतर हाशिमने फिर्यादीला फोन करून भेटण्यास बोलावले. सुरुवातीला फिर्यादीने नकार दिला असता “मला फक्त बोलायचे आहे,” असे सांगून अंबड लिंक रोडलगतच्या मदरशाजवळ बोलावण्यात आले.
फिर्यादी व त्यांचा मित्र अमजद शहा तेथे गेल्यानंतर दोन-तीन युवकांनी फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने काळ्या रंगाच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना खाडी परिसरातील एका मोकळ्या जागी नेण्यात आले. तेथे हाशिम, कैफ, फरहान व अन्य साथीदार उपस्थित होते. त्यांनी “गयास कुठे आहे?” अशी विचारणा करत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. फिर्यादीने माहिती नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, हाशिम याने कोयत्याने पाठीवर वार केला, तर कैफ याने फायटरने मारहाण केली. तसेच “तुझा जीव वाचवायचा असेल तर वडिलांकडून २० हजार रुपये मागव,” अशी धमकी देण्यात आली. यानंतर फिर्यादीने भावाला फोन करून पैसे आणण्यास सांगितले. दरम्यान, आरोपींनी पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
संधी साधून फिर्यादी व त्यांचा मित्र तेथून पळून गेले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम जिल्हा रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप भांडे करीत आहेत.