ठळक मुद्दे
मंत्री छगन भुजबळ यांची येवला रेल्वे स्थानकाची पाहणी
अमृत भारत स्टेशन अंतर्गत येवला रेल्वे स्थानकातील विकास आराखड्याचा आढावा
येवला रेल्वे स्थानकास अधिक गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्न
येवला (नाशिक) : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी येवला रेल्वे स्थानकावरील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. अमृत भारत स्टेशन अंतर्गत येवला रेल्वे स्थानकातील विकास आराखड्याला गती देऊन काम सुरू करण्यात यावी अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वेच्याअधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री भुजबळ यांनी येवला रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी मध्यरेल्वेचे सिनियर इंजिनियर देवेंद्र, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, स्टेशन प्रबंधक योगेश कोल्हे, हुसेन शेख, वसंत पवार, दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, राजेश भांडगे, मकरंद सोनवणे, अविनाश कुक्कर, प्रवीण पहिलवान, सुभाष गांगुर्डे, विनोद ठोंबरे आदी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले की, अनेक दिवसांपासून येवला रेल्वे स्थानकाच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यानुसार आता अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्यात असून या आराखड्यातील कामांना सुरुवात करण्यात येईल. तत्पूर्वी या रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनचे काम, प्लॅटफॉर्म एकची लांबी वाढविण्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या. या रेल्वे स्थानकावर खतांचे रॅक उतरविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. याबाबत गुड्स शेड, प्लॅटफॉर्म वरील शेड्स, हाय लेव्हल प्लॅटफॉर्म, शेड यांची कामे पूर्ण करण्यात यावी. शहराचा विकास झपाट्याने होत आहे. येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने याठिकाणी अधिक गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यांनी यावेळी केल्या.