येवला : पुढारी वृत्तसेवा
दुष्काळाच्या झळा सोसत पाण्याच्या काटेकोर नियोजन करून तीन एकरांवर उभे केलेले कोबीचे पीक बाजारभावाच्या पडझडीमुळे अक्षरशः मातीत मिसळण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. नागडे शिवारातील शेतकरी गुलाबराव सोनवणे यांनी सुमारे तीन लाख रुपये खर्चून उभ्या केलेल्या कोबीला अवघा दोन रुपये किलोचा भाव मिळू लागल्यामुळे संतप्त होऊन पिकात मेंढ्या चरण्यास सोडल्या. त्यानंतर रोटावेटर फिरवून संपूर्ण उभे पीक नष्ट केले.
बाजारभावाच्या अनिश्चिततेने शेतकऱ्याला उत्पादन खर्चही वसूल करता येत नसल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. यंदा परिसरात दुष्काळाचे तीव्र सावट असल्यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही सोनवणे यांनी उपलब्ध पाण्याच्या नियोजन करून तीन एकर क्षेत्रावर कोबीची लागवड केली होती.
भाजीपाला पिकातून उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने रोपे, मजुरी, रासायनिक खते, निंदणी तसेच ट्रॅक्टर मशागत यासाठी त्यांनी सुमारे तीन लाख रुपये खर्च केले. पीक काढणीला आल्यानंतर सुरुवातीला कोबीला साडेसहा रुपये किलोचा भाव मिळाला होता. त्यातून १२ टनांची एक गाडी बाजारात पाठवून सुमारे ८० हजार रुपये मिळाले होते.
मात्र, त्यानंतर बाजारातील आवक वाढल्याने भाव झपाट्याने घसरला. कोबीचा दर अवघा दोन रुपये किलोवर आला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याने उर्वरित पीक विकणेही परवडेनासे झाले. त्यातच व्यापाऱ्यांकडून खरेदीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहिले.
अशा परिस्थितीत उभ्या पिकाची काढणी, वाहतूक आणि बाजारात विक्री करण्यासाठी होणारा खर्चही परवडत नसल्यामुळे कष्टाने उभे केलेले पीक स्वतःच्या डोळ्यांसमोर नष्ट करण्याची वेळ सोनवणे यांच्यावर आल्याने ते भावुक झाले होते.
"महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन आल्याने कोबीचे बाजारभाव अचानक पडले. सध्या दोन रुपये किलो कोबीला बाजारभाव आहे. त्यामुळे कोबी काढणीस परवडत नाही. थोडक्यात भाजीपाला पिकाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध नाही त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आहे."- गुलाब सोनवणे, शेतकरी, नागडे.