येवला : पुढारी वृत्तसेवा
वाढती उष्णता, बाष्पीभवन आणि अपुऱ्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावामधील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. त्यातच पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मर्यादित स्वरूपात मिळणार असल्याने भविष्यातील भीषण पाणीटंचाई टाळण्यासाठी नगरपालिकेने यापुढे शहरात तीन दिवसांसंऐवजी पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावांमध्ये सध्या केवळ एक ते दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार पिण्याच्या पाण्याचे पुढील आवर्तन डिसेंबर महिन्यात सोडण्यात येणार आहे. यामुळे हा उपलब्ध पाणीसाठा पालिकेला आगामी अडीच महिने पुरवावा लागणार आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात पालखेड डाव्या कालव्याचे ओव्हरफ्लो आवर्तन आले होते.
या आवर्तनाद्वारे शहराच्या पाणीपुरवठा टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात पाणी साठवून ठेवले होते. पावसाळा संपला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यातही दुष्काळाचे सावट कायम राहिले. परिणामी पावसाळ्यापासूनच शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू होता. मात्र वाढत्या संकटामुळे आता हा कालावधी वाढवून पाच दिवसांवर आणला आहे. पावसाळा कोरड्या गेल्याने चिंता वाढली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या परिसराजवळ सुमारे ३०० पेक्षा अधिक विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) आहेत. या स्रोतांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होत असल्याने तलावातील साठ्यावर ताण येत आहे. त्यामुळे तलावाच्या परिसरातील विहिरी व बोअरवेल्सच्या अनियंत्रित उपशावर प्रशासनाने ताிडने निबंध घालावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांनी पाणी वापरताना अपव्यय टाळावा. यंदा पावसाळा कमी झालेला असल्याने धरणात पाणीसाठा कमी उपलब्ध आहे. शासनाने पाणीपुरवठ्यात कपात सुचविलेली असून, यामुळे हा निर्णय घेतला आहे.— तुषार आहेर, मुख्याधिकारी, पालिका, येवला