Rain file photo
नाशिक

Nashik Rain Update| येवला तालुक्यात 46 दिवस पावसाचा खंड! खरीप पिके वाळली, दुष्काळाची भीषण सावली

Nashik Rain Update| खरीप पिके धोक्यात ; रब्बी हंगामासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर

पुढारी वृत्तसेवा

येवला : पुढारी वृत्तसेवा

तब्बल ४६ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे येवला तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप पिके करपण्याच्या स्थितीत असून, परिसरात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार समीर भुजबळ यांनी ममदापूर व राजापूर परिसरातील बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली.

या वेळी त्यांनी मका, सोयाबीन आणि बाजरी या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आगामी रब्बी हंगामाची चिंता शेतकऱ्यांनी मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार तालुक्यातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये. पुढील दोन दिवसांत दुष्काळग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे पूर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येवला तालुक्याच्या पूर्व भागातील गरजू गावांमध्ये आठवडाभरात गरजेनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्याचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले. सध्याचे मदतीचे निकष पुरेसे नसल्यास, त्यात आवश्यक बदल करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन समीर भुजबळ यांनी दिले.

लवकरच मंत्री छगन भुजबळ स्वतः या भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, मच्छिंद्र थोरात, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नितीन गायकवाड, दीपक गायकवाड, सुनील पैठणकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT