मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. File Photo
नाशिक

Yeola Assembly | येवल्यात संघर्षाची ठिणगी, मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूकांकडून दावे-प्रतिदावे केले जात असल्याने महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितल्याने महाविकास आघाडीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसच्या ओबीसी सेलचे कार्यकारी अध्यक्ष दत्ता आव्हाड यांनी पक्षाकडे येवला मतदारसंघाची मागणी केली आहे.

भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे येवला विधानसभा मतदार संघ नेहमी चर्चेत असतो. सलग चार विधानसभा निवडणुकीत भुजबळ हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर भुजबळ हे अजित दादा गटात सहभागी झाले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भुजबळ यांच्यासमोर शरद पवार गटाकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. या मतदार संघावर २००४ ते आजपावेतो गत चार पंचवार्षिक निवडणुकींपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. तसेच त्याआधी १९९५ व १९९९ या कालावधीतील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. तर १९९० मध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे या मतदार संघावर सुमारे तीन दशकांपासून शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाने आघाडीतील इच्छुकांकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्यातही लोकसभा निवडणुकीत आघाडीतील घटक पक्षांमध्ये काँग्रेस पक्षास सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी केल्याचे दिसते. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून विधानसभेच्या जागांबाबत अनेक दावे केले जात असतानाच आता येवला मतदार संघावरही काँग्रेसच्या वतीने दावा केल्याने भविष्यात कशी लढत होते याकडे लक्ष लागून आहे.

येवला मतदार संघ पहिलेपासून काँग्रेस विचारधारेचा आहे. आघाडी धर्म पाळण्यासाठी काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीस दिली होती. मात्र, भुजबळ यांनी मित्रपक्ष व मतदारांची फसवणूक केली आहे. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा काँग्रेसला मिळाला पाहिजे. मतदार संघातील अनेक प्रश्न सुटलेले नाही. मतदार संघाचा विकास करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसकडून ही जागा लढवण्याची मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT