विंचुरी दळवी (नाशिक) : सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे सोनांबे रोडवर विलास हारक यांच्या पडवीत कुत्र्याचा पाठलाग करताना घुसलेल्या बिबट्याला हारक यांनी समयसूचकतेने पडवीतच कोंडल्यामुळे वनविभागाने अतिशय शिताफीने त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.
हारक यांचे घर शेतातच आहे. हारक कुटुंबीय रात्रीचे जेवण करून बसले असताना पाळीव कुत्र्यांचा पाठलाग करीत बिबट्या घराच्या पडवीत शिरला होता. हारक यांनी तातडीने दोन्ही दरवाजे बंद करत बाहेरून कडी लावल्याने बिबट्या पडवीत कोंडला गेला. शुक्रवारी (दि. 20) रात्री 10.30 च्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला. पडवीतून बाहेर पडण्यासाठी बिबट्याने दरवाजाला ध़डका दिल्या. तसेच त्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता. याबाबत उत्तम हारक यांनी तत्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. रात्री 11.30 च्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक सावर्डेकर, सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने पडवीच्या दरवाजावर पिंजरा लावला. पहाटे 2.30 च्या सुमारास बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला.
जेरबंद करण्यात आलेला बिबट्या हा चार वर्षांचा नर आहे. पथकात वनपरिमंडळ अधिकारी एस. आर. हिंदे, वनरक्षक शीतल तांबे, नीलेश निकम, वनकर्मचारी बाबूराव सदगीर, रमेश कवठे, रोहित लोणारे आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बिबट्याला पिंजऱ्यासह नांदूरशिंगोटे येथील वनविभागाच्या कार्यालयात हलवले.