ठळक मुद्दे
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर वर्षभराच्या हिशेबासाठी लागणारी वही अर्थात चोपडीचे पूजन
हिशोबाच्या वह्या म्हणजे हिशोब ठेवण्याचे साधन नसून श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक
ग्राहकांकडून मुहूर्तावरच खरेदी करणे पसंत
नाशिक : लक्ष्मी पवार
आजच्या युगातील बहुतांश व्यवहार डिजिटल माध्यमातून होत असले तरी महालक्ष्मी वह्या फक्त हिशोब ठेवण्याचे साधन नसून श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक मानल्या जातात, म्हणून अनेक जण आजही महालक्ष्मी वह्यांना तितकच महत्व देत असून यातून पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळत आहे. ( Lakshmi Pujan in Diwali )
दिवाळीच्या आगमनाने शहरातील बाजारपेठा उजळल्या आहेत. महालक्ष्मी पूजनासाठी खरेदीलाही उत्साह येत असून व्यापारी वर्ग नवीन रोजमेळ, खतावणी, हिशोबाच्या वह्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करतांना दिसत आहे. 'शुभ लाभ', ' ओम श्री गणेशाय नमः' अशा सुवर्णाक्षरी पारंपरिक वह्या विक्रीसाठी बाजारात झळकत आहे.
विशेष म्हणजे, रोजमेळ, खतावणी खरेदीसाठी शुभ मुहूर्त असतात, ग्राहक त्या मुहूर्तावरच खरेदी करणे पसंत करतात. व्यापारी रोजमेळचा वापर दैनंदिन जमाखर्च लिहिण्यासाठी तसेच खतावणीचा ग्राहकांचे हिशोब नोंदवण्यासाठी करत असतात. काही महालक्ष्मीचा फोटो असलेल्या वह्या आणि डायरींचेही पूजन करतात.
मेहनतीचा आणि उत्पन्नाचा साक्षीदार
'एप्रिल ते मार्च' आणि 'दिवाळी ते दिवाळी' अशा दोन प्रकारात रोजमेळ उपलब्ध आहेत. लेटर साइजची किंमत १५० रुपयांपासून पुढे, तर फुल साइजची किंमत ४०० रुपयांपासून पुढे आणि खतावणी ६० रुपयांपासून पुढे, क्वायरनुसार उपलब्ध आहेत. अशा वह्या म्हणजे वर्षभराच्या मेहनतीचा आणि उत्पन्नाचा साक्षीदार असा दस्तऐवज असतो. लक्ष्मीपूजनाच्या वेळी ही वही देवासमोर ठेऊन 'शुभ लाभ' लिहिणे हा नव्या सुरुवातीचा शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे नव्या युगातही पारंपरिक वह्या, खतावण्यांना मागणी आहे.
सोमवारपासून मुहूर्त - डिजिटल हिशोब तात्पुरता असतो, पण हाताने लिहिलेले नाव, आकडा आणि शुभ लाभ हे भावनिक आणि पारंपरिक दोन्ही रुप जपतात. दररोजचा हिशोब डिजिटल माध्यमातून करत असलो तरी त्यासह वह्यांमधेही नोंद करत असतो. या वह्या शुभ मुहूर्तावर विकल्या जातात. त्यासाठी सोमवार (दि. १३) पासून मुहूर्त चालू होत आहेत. डिजिटल युगातही पारंपरिक वह्यांचा मान टिकवणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.विलास पवार, व्यावसायिक, नाशिक.