महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी महिला दिनानिमित्त नाशिककर महिलांसाठी विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने शहरात 'स्मार्ट महिला हब' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमातून महिलांना डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक केंद्र उभारले जाणार आहे, ज्यामुळे महिलांना अर्थसाहाय्य आणि व्यावसायिक प्रगतीस चालना मिळेल.
नाशिकच्या नियोजनबद्ध विकासात आयुक्त खत्री यांचा महत्त्वाचा वाटा असून, त्यांनी महिलांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. प्रशासनातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात महिलांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी योजना राबविल्या जात असून, निराधार विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी एक लाखाचे अर्थसाहाय्य दिले जात आहे. आतापर्यंत ४०० महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच, विधवा व निराधार मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना असून, ४५०० लाभार्थींना मदत देण्यात आली आहे.
याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबवली जात असून, २९ कोर्सेसच्या माध्यमातून सात हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रमाणपत्रांच्या आधारे महिलांना स्वयंरोजगार व नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. आता स्मार्ट महिला हब उभारण्याचा निर्णय घेतला असून, येथे डिजिटल साक्षरता व तंत्रज्ञान कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, शहर विकासाच्या निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग निश्चित करण्यासाठी विशेष महिला निर्णय समिती स्थापन केली जाणार आहे, असे आयुक्त खत्री यांनी सांगितले.
* नाशिक महिला उद्योजिका विकास केंद्र
* महिला आरोग्य तपासणी शिबिरे
* महिला बचतगट प्रोत्साहन योजना
* मातृत्व अनुदान योजना
* मुलींच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षेसाठी लाडकी बहीण योजना
* निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांच्या मुलीच्या विवाहाकरिता अर्थसाहाय्य
* विधवा, घटस्फोटित महिलांच्या मुलांना तसेच निराधारांना शिष्यवृत्ती योजना
* महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सुरक्षा निश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. महिला सशक्त झाल्या, तरच शहराचा संपूर्ण विकास होऊ शकतो, या दृष्टीने नाशिक महानगरपालिका सातत्याने कार्यरत आहे.- मनीषा खत्री, आयु्क्त, तथा प्रशासक, महापालिका