ठळक मुद्दे
हंगामात ३ कोटी लिटर इतके वाइनचे उत्पादन : देशांतर्गत सर्वाधिक विक्री, तर ७ ते ८ टक्के निर्यात
४० हजार वाइन केसची विक्री, दीड हजार कोटीची उलाढाल : राज्य सरकारला २५ हजार कोटींपेक्षा अधिक महसूल
नाशिकसह सांगली, पुणे, बारामतीत वाइनचे उत्पादन : २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात ३० हजार टन द्राक्षांचे गाळप
Nashik's grape season in crisis due to unseasonal rains
नाशिक : सतीश डोंगरे
'अवकाळी नंतर अतिवृष्टी व पुन्हा अवकाळी' असा सलग मे ते ऑक्टोबर पाऊस बरसल्याने द्राक्षबागांना त्याचा मोठा फटका बसला आहे. सततच्या हवमान बदलामुळे ७० टक्क्यांपेक्षा जास्त द्राक्षबागांना फळधारणाच झाली नसल्याने, यंदाचा द्राक्ष हंगाम संकटात सापडला आहे. पर्यायाने याचा मोठा परिणाम राज्यातील वाइन उत्पादनावर होणार असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाइन उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. अशात गत हंगामात वाइन उत्पादकांनी घेतलेल्या 'सरप्लस' उत्पादनाचा वाइन उत्पादकांना काहीसा आधार असणार आहे.
राज्यातील नाशिकसह सांगली, पुणे, बारामतीत वाइनचे उत्पादन घेतले जाते. गत हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यात ३ कोटी लिटर इतके वाइनचे उत्पादन घेण्यात आले आहे. नाशिकमध्ये ४५ वायनरीज असून, देशातील वाइनच्या एकूण उत्पादनात ९० टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. तर त्या ९० टक्क्यांमध्ये ८० टक्के वाइनचे उत्पादन नाशिकमध्ये घेतले जात असून, उर्वरित १० टक्के उत्पादन सांगली, पुणे व बारामतीत घेतले जाते. २०२३-२४ या हंगामात द्राक्षांना पोषण वातावरण असल्याने, नाशिकमध्ये ३० हजार टन द्राक्षांचे गाळप करण्यात आले होते. २०२४-२५ मध्ये त्यात आणखी भर घालत उत्पादकांनी 'सरप्लस' (गरजेपेक्षा किंवा मागणीपेक्षा जास्त) उत्पादन घेतले.
मात्र, पुढील हंगाम हा वाइनला संकटात आणणारा असणार आहे. अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे राज्यातील ६० टक्के द्राक्षबागा पाण्याखाली गेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात १ लाख ७५ हजार एकरावर द्राक्ष पीक घेतले जाते. त्यापैकी ४५ हजार हेक्टरवरील द्राक्षबागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. तर सांगली जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरवरील द्राक्षबागा पाण्याखाली गेल्या आहेत. द्राक्षबागा संकटात सापडल्याने, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तब्बल ३५ हजार एकरावरील द्राक्षाबागांवर कुऱ्हाड चालविली आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम वाइन उत्पादनावर होणार आहे. तूर्त 'सरप्लस' उत्पादनांमुळे उत्पादक काहीसे निर्धास्त असले तरी, पुढील हंगाम 'वाइन'साठी अडचणीचा ठरणार आहे.
निर्यातीला फटका
एका अहवालानुसार भारतात वार्षिक सुमारे १५.४ मिलियन लिटर इतके वाइनचे उत्पादन घेतले जाते. यापैकी केवळ ७ ते ८ टक्केच वाइनची निर्यात केली जाते. तर उर्वरित वाइनची देशांतर्गतच विक्री केली जाते. पुढील हंगाम वाइन उत्पादनावर परिणाम करणारा ठरणार असल्याने, निर्यातीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अशात निर्यातीमधून येणारी परकीय गंगाजळी रोखली जाणार आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये परिणाम
२०२५-२६ या वर्षाचा वाइन हंगाम मार्च २०२६ मध्ये सुरू होणार आहे. मार्चमध्ये क्रशिंग केले जाणार असून, पुढे उत्पादन प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रत्यक्ष उत्पादन सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये बाजारात आणले जाणार असल्याने, त्यात तब्बल ४० टक्के तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय द्राक्ष उत्पादन घटल्यास त्याच्या किमती वाढणार असल्याने त्याचाही परिणाम उत्पादनावर होणार आहे. विशेषत: टेबल वाइनला मोठा फटका बसणार आहे.
सरप्लस उत्पादनाचा वाइन उद्योगाला पडत्या काळात आधार मिळणार आहे. अवकाळीचा फटका लगेचच जाणवणार नसला तरी, पुढे ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाइन उद्योगावर परिणाम करणारा ठरणार आहे. निर्यातीला ब्रेक लागेलच, मात्र द्राक्षांच्या किमती भडकल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे.जगदीश होळकर, अध्यक्ष, अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटना, नाशिक.
परकीय वाइनला सुगीचे दिवस
केंद्र शासनाच्या मुक्त व्यापार धोरणामुळे मागील वर्षात ऑस्ट्रेलिया व युरोपीय देशांतून वाइनची आयात वाढली आहे. देशांतर्गत वाइनचा तुटवडा निर्माण झाल्यास परकीय वाइनला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. अगोदरच शासनाच्या या धोरणामुळे वाइन उत्पादकांच्या महसुलात २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. आता अवकाळी पाऊस परकीय वाइनला पोषक ठरण्याची शक्यता आहे.