नांदगाव: नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्यास सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा आमदार सुहास कांदे यांनी दिला. नांदगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. नांदगाव तालुक्याला राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाने घोषित केलेल्या ट्रिगर १ व ट्रिगर २ या उपाययोजनांमध्ये वगळण्यात आल्याने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली होती. सोशल मीडियावर याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु होत्या.
याच संदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत येथील शिवनेरी शासकीय विश्राम गृहात दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार कांदे म्हणाले की, आपला तालुका दुष्काळ पात्र असूनही पहिल्या यादीत समाविष्ट केलेला नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्यासोबत बोललो आहे. लवकरच या संदर्भात प्रत्यक्षात त्यांची भेट घेणार आसल्याचे त्यांनी सांगितले.
तरीही तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देईल. सरकारविरोधात कोर्टात जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी तहसीलदार सिध्दार्थकुमार मोरे आणि तालुका कृषी अधिकारी डंबाळे यांनी वरिष्ठ कार्यालयात दुष्काळ परिस्थितीबाबात अहवाल सादर केला असल्याचे सांगितले. गरज पडल्यास परत नविन अहवाल सादर करु, असे त्यांनी सांगितले.
नांदगाव तालुक्यातील चालू वार्षिक पैसेवारी : ३६ पैसे
चालू वर्षी आतापर्यंत पाऊस पडल्याची टक्केवारी : ६४.३ %
आणि तालुक्यात सद्यास्थितीत सुरू टँकर संख्या : ३४