शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे  Pune News
नाशिक

बोगस दिव्यांग विद्यार्थी शोधणार; फी वाढीबाबत कारवाई करणार | Dada Bhuse

शिक्षणमंत्री भुसे यांची नाशिकमध्ये घोषणा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक आहे. मात्र, काही शाळांमध्ये कागदोपत्री बोगस दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंद करून शासन अनुदान लाटण्यात येते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष तपास मोहीम (ड्राइव्ह) राबवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. शिवाय विनाकारण फीवाढ करणाऱ्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हा परिषद शाळांचा आढावा घेतल्यानंतर भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अनेक खासगी इंग्रजी शाळांकडून फीमध्ये अतिरिक्त वाढ करण्यात येत आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत शासन अत्यंत गंंभीर आहे. ज्या पालकांच्या फीवाढीसंदर्भात तक्रारी असतील, त्यांनी त्या शिक्षण विभागाला कळवाव्यात, कोणी चुकीची कामे करत असतील, तर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी दिली. येत्या सोमवार (दि. 16) पासून नूतन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही शाळांमधील इयत्ता पाचवी आणि सहावीतील विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नाही, एका ठिकाणी विद्यार्थ्याला गणिताचे उत्तर देता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र निपुण महाराष्ट्र या संकल्पनेद्वारे विद्यार्थी घडविण्यात येत आहेत. याचे सकारात्मक परिणाम आपल्याला लवकरच पाहायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या शाळेत जे प्रवेश घेतील, त्यांचा कर सरपंच भरतील असा निर्णय शिंदे गावच्या सरपंचांनी घेतला आहे. या निर्णयाचे शिक्षणमंत्र्यांनी स्वागत केले. अल्पसंख्याक शाळांच्या अनुदानाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून, त्यांना न्याय देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आमच्यात गट नाहीत; शिवसेना एकसंघ

अलीकडेच शिंदे सेनेतील गटबाजीबाबत चर्चा सुरू झाल्यामुळे याबाबत शिक्षणमंत्र्यांना विचारले असता, आमच्यात कुठलीही गटबाजी नाही. शिवसेना एकसंघ असून, महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करीत मनसेबाबत इथे बसून काय सांगणार असा प्रतिप्रश्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT