Nashik News : पंचवटीत स्वागत कमान कोसळली File photo
नाशिक

Nashik News : पंचवटीत स्वागत कमान कोसळली, आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्वागतासाठी पंचवटीतील भाजपच्या एका माजी नगरसेवकाने ड्रीम कॅसल चौकात कमान उभारली हाेती.

पुढारी वृत्तसेवा

Welcome arch collapses in Panchavati

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्वागतासाठी पंचवटीतील भाजपच्या एका माजी नगरसेवकाने ड्रीम कॅसल चौकात उभारलेली कमान बुधवारी (दि. २४) अचानक कोसळली. या कमानीखाली एक वाहन दबल्याने नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या जाहिरात परवाना विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेकायदेशीर कमान उभारल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव इच्छुकांसाठी पर्वणी ठरत आहे. सण-उत्सवाच्या निमित्ताने रामवाडीकडे मतदारांना आकर्षित करण्याची नामी संधी इच्छुकांनी साधली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी कमानी, फलकांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेची परवानगी न घेता या फलकांची उभारणी केली जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

अशातच पंचवटीतील मखमलाबादकडून आणि चोपडा लॉन्सकडे येणाऱ्या ड्रीम कॅसल चौकामध्ये असलेली एका माजी नगरसेवकाने उभारलेली स्वागत कमान बुधवारी अचानक कोसळली. यावेळी परिसरामध्ये मोठा आवाज झाल्यामुळे स्थानिक नागरिक भयभयीत झाले. या ठिकाणी चौकामध्ये सिग्नल असून, बऱ्याच वेळेस या ठिकाणी वाहनांची लांबलचक रांग लागलेली असते. सुदैवाने ज्यावेळेस कमान कोसळली त्यावेळेस सिग्नलवर फारशी वाहनांची वर्दळ नव्हती. जीवितहानी टळली.

महापालिकेच्या मालमत्तेचेही नुकसान

स्वागत कमान पडल्यामुळे महापालिकेच्या विद्युत खांबाचे नुकसान झाले आहे. दुभाजकाचीही मोडतोड झाली आहे. महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून भरपाई मागितली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT