येवला (नाशिक) : येथील सम्राट वर्मा ग्रुपकडून एक रुपयात २१ जोडप्यांचे २२ डिसेंबरला सामुदायिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजसेवेचा नवा वारसा येथे जपला जाणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत अशा गरजूंना मदतीचा हात पुढे करत असल्याचे कृष्णा एन्झोटेक कंपनीचे संचालक सम्राट वर्मा यांनी या सोहळ्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
कंपनीच्या संचालिका मिनल वर्मा यांच्या जन्मदिनानिमित २२ डिसेंबरला एरंडगाव येथील वर्मा लॉन्स येथे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला हिंदी चित्रपट अभिनेते तुषार कपूर उपस्थित राहणार आहे. आपण काहीतरी समाजकार्य उभे करू शकतो या हेतूने सामाजिक बांधिलकी जपत सम्राट वर्मा ग्रुपने सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन केले आहे. सोहळ्यास साधूसंतांचे आशीर्वाद मिळणार आहे. २१ पेक्षा अधिक जोडपी सहभागी झाले तरी त्यांना संधी दिली जाणार आहे.
सामाजिक, ऐतिहासिक व प्रेरणादायी असा उपक्रम येवल्यात प्रथमच होत आहे. सर्वधर्मिय समुदायिक विवाह सोहळ्यातून वेळ, श्रम व आर्थिक बचत व्हावी या हेतूने आयोजन केले आहे. सामाजिक बांधिलकी जपताना सर्वसामान्य कुटुंबीयांसाठी असे सोहळे गरजेचे ठरतील.सम्राट वर्मा, आयोजक, येवला
सर्व जोडप्यांना वर्मा यांच्याकडून मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तू देण्यात येणार आहे. विवाहासाठी डीजे, बँड, पुष्पहार, विवाह मंडप सुविधा दिली जाणार आहेत. १५ डिसेंबरपर्यंत प्रथम आलेल्या २१ जोडप्यांची १ रुपयात नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी वधू १८ व वराचे वय २१ वर्षे वयाचा दाखला, वधूवरांचे डोमिसाईल प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, आई वडिलांचा रहिवासी दाखला, वधूवराचे प्रत्येकी दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारकार्ड, पॅनकार्ड, सक्षम अधिकाऱ्यांच्या सही आणि शिक्का असलेले जात प्रमाणपत्र व विवाह नोंदणीसाठी आई वडील व एक साक्षीदार उपस्थित असणे आवश्यक आहे.