नाशिक : जिल्ह्याचे तापमान चाळिशीपार गेल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यातील घाट परिसरातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम व तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. काही ठिकाणी पावसासह मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. शनिवार (दि. 3) ते मंगळवार (दि. 6) या कालावधीत हवामान विभागाने पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. दरम्यान राज्यात उकाडा कायम असून, शुक्रवारी (दि.2) सोलापूर, अकोला आणि जळगावमध्ये तापमानाने 44 अंशांची पातळी गाठली, तर पुण्यात 43 अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वत्र तापमानाने चाळिशी पार केली असताना अवकाळीचे संकटही घोंघावत आहे. शेतकर्याने रब्बी पिकांची पेरणी केलेली असताना अवकाळी आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
उत्तरेकडून येणार्या वार्यांमुळे वातावरणातील आर्द्रता वाढल्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बदलत्या हवामानाचा विचार करून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामन विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाचा प्रभाव काही दिवस राहिल्यास पुन्हा राज्यात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.