वावी (नाशिक) : भोजापूर धरणातून कालव्याद्वारे पूरपाणी 12 दिवस दुशिंगपूर बंधाऱ्यात सोडण्याच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेतले. शनिवारी (दि. 2) बंधाऱ्यात प्रत्यक्ष पाणी सोडल्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले.
भोजापूर धरणाचे पाणी दुशिंगपूर बंधाऱ्यात पडलेले नसतानाही कागदोपत्री तसे दाखविण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवार (दि.1) पासून धरणावर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुभाष पगारे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी लेखी आश्वासन दिले. पूरचारीच्या एका बाजूने येण्या-जाण्यासाठी मार्ग करण्यात येणार आहे. चारी दुरुस्तीचे राहिलेले काम लवकर पूर्ण करण्यात येईल, पूरपाणी सोडल्यानंतर कालवा फोडणारे व पाणी वळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, माळवाडी बंधाऱ्यात स्वतंत्र चारीद्वारे पाणी देण्यात येईल, 2 ते 13 ऑगस्ट या 12 दिवसांच्या कालावधीत दुशिंगपूर पाझर तलावात पाणी सोडण्यात येईल, धरणाचा सांडवा सुरू असल्यास माळवाडी धरणात आठ दिवस व त्यानंतर दुशिंगपूरला प्राधान्य देण्यात येईल, असे लेखी आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले.
दरम्यान, पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ उपअभियंता तुषार खैरनार, उपअभियंता नारायण डावरे यांनी सर्वेक्षण करुन दुसंगवाडी बंधाऱ्यात पाणीच पोहचलेले नसल्याचा अहवाल सादर केला होता. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली.
सरपंच कानिफनाथ घोटेकर, भाऊसाहेब घोटेकर, रावसाहेब कदम, धनंजय बहिरट, सोमनाथ नवले, समाधान ढमाले, नंदू गोराणे, सुनील गोराणे, कचरु घोटेकर, रावसाहेब सरोदे, नारायण गोराणे, विष्णू शिंदे, रविंद्र ढमाले आदींसह शेतकरी उपोषणात सहभागी झाले होते.
पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल सहाणे, उपअभियंता सुभाष पगारे यांनी शुक्रवारी रात्री उशीरा शेतकऱ्यांची भेट घेतली होती. परंतु, उपोषण मागे घेण्याचे मागणी फेटाळून लावली होती. पाणी सोडल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यावर शेतकरी ठाम राहिले होते. त्यानंतर तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी शेतकरी व पाटबंधारे अधिकाऱ्यांत समन्वय घडवून आणला.