नाशिक : जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉईड आणि कावीळ यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य व पाणीपुरवठा विभाग सतर्क झाला असून, संपूर्ण जिल्ह्यात विशेष खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, आरोग्य कर्मचारी आणि पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना तातडीने उपाययोजनांचे स्पष्ट निर्देश अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी दिले आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. यात सर्व सार्वजनिक विहिरी, कूपनलिका व पाण्याच्या टाक्यांची पाहणी करून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
३३ टक्के टी.सी.एल. ब्लिचिंग पावडर वापरून पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. दररोज पाण्यात क्लोरीनचे योग्य प्रमाण (०.२ ते ०.५ मिग्रॅ/लिटर) तपासण्यासाठी 'ओटी टेस्ट' घेतली जात आहे. संशयित पाण्याच्या नमुन्यांची तातडीने प्रयोगशाळेत तपासणी होत असून अहवाल येईपर्यंत पर्यायी सुरक्षित पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
नागरिकांनी घ्यावी ही खबरदारी
पिण्याचे पाणी नेहमी उकळून, गाळून आणि झाकून वापरावे. गढूळ किंवा दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी पूर्णपणे टाळावा. अतिसार, उलट्या, तीव्र ताप किंवा मळमळ अशी लक्षणे आढळल्यास आजार अंगावर न काढता तत्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र किंवा आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधावा.
पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. प्रशासनातर्फे पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जात असले, तरीही नागरिकांनी उकळलेलेच पाणी प्यावे.
- डॉ. राजेंद्र बागूल (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.)