Water Scarcity North Maharashtra Pudhari News Network
नाशिक

Water Scarcity North Maharashtra | उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्र

विभागातील १६२ गावे, ५५७ वाड्यांना १७२ टँकरद्वारे पाणी; धुळे, नंदुरबार अद्यापही टँकरमुक्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आसिफ सय्यद

लहान- मोठी तब्बल ३१९ धरणे असलेल्या उत्तर महाराष्ट्रात गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक जलसाठा असला तरी उन्हाची तीव्रता टंचाई झळा वाढविणारी ठरली आहे. विभागातील १६२ गावे, ५५७ वाड्यांमध्ये सद्यस्थितीत १७२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, यामध्ये अहिल्यानगरात सर्वाधिक ९०, तर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या मे आणि जून महिन्यांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने टंचाई कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

प्रशासकीय दाव्यानुसार, गतवर्षीच्या तुलनेत यंदा विभागातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील १०२ लहान-मोठ्या धरणांमध्ये गतवर्षी असलेला २४.८४ टक्के जलसाठा यंदा २९.७२ टक्के आहे. धुळ्यातील ५६ प्रकल्पांमध्ये गतवर्षीचा २९.३१ टक्के साठा यंदा ५३.५९ टक्के आहे. जळगावातील ११३ प्रकल्पांमध्ये गतवर्षीचा ३४.४३ साठा यंदा ४०.७० टक्के इतका आहे. नंदुरबारमधील आठ प्रकल्पांमध्ये मात्र गतवर्षी ७९.२९ टक्के जलसाठा होता. यंदा तो ६०.३७ इतका आहे. तापमानाचा वाढता पारा धरणांतील जलसाठा वेगाने घटवण्याची शक्यता लक्षात घेत यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

गतवर्षीपेक्षा टँकरसंख्या घटली

धरणांमध्ये तूर्त समाधानकारक साठा दिसत असला तरी विभागातील १६२ गावे, ५५७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. याठिकाणी २७ शासकीय तर १४५ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी याच कालावधीत विभागात ५७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्या तुलनेत टँकरसंख्या तिपटीने कमी असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. यात नाशिक जिल्ह्यातील ७७ गावे, १५५ वाड्यांमध्ये ७४ टँकरद्वारे, जळगावमध्ये ७ गावांमध्ये ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत सद्यस्थितीत एकही टँकर सुरू नाही. विभागात गावातील नागरिकांना पिण्यासाठी ३५, तर टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ४७ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. टँकरद्वारे विभागातील तब्बल ३ लाख ४४ हजार ३०३ ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.

येथे सर्वाधिक पाणीटंचाई..

सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव येथे दहा, चांदवडला चार तर येवल्यात तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय. सिन्नर, पेठ, मालेगावला दोन, तर सटाणा, त्र्यंबक, इगतपुरी, ओझर, दिंडोरी, देवळा याठिकाणी एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जळगावमधील पारोळ्याला दहा, भुसावळ, बोदवडला आठ, तर, चाळीसगाव, अमळनेरला चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. धुळ्यातील शिंदखेडा येथे चार तर दोंडाईचाला दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध

विभागात एकूण ६५ लाख ५१ हजार ३०७ लहान मोठी जनावरे आहेत. या जनावरांसाठी प्रतिमाह १६ लाख १३ हजार ४३० मे. टन चाऱ्याची गरज आहे. मार्चअखेर विभागात १ कोटी ४६ लाख ६८६ मे. टन चारा उपलब्ध होता. हा चारा विभागातील जनावरांना आठ महिने पुरेल इतका आहे. यात नाशिक जिल्ह्यात ६ महिने, धुळे ७, नंदुरबार ६, जळगाव ७ तर अहिल्यानगरात १२ महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक जलसाठा आहे. पाणीटंचाई जाणवत असलेली गावे, वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाई कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT