नाशिक रोड : राज्यात मागील आठवड्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असल्या, तरी नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांना अद्यापही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. सध्या 12 तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना, नाशिक, निफाड व दिंडोरी तालुक्यांमध्ये मात्र शून्य टँकर पाणीपुरवठा नोंदविण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात एकूण ५९६ गावे व वाड्यांना 150 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुका सर्वाधिक टंचाईग्रस्त आहे. नांदगावमध्ये तब्बल 168 गावांमध्ये 27 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर येवला तालुका 110 गावांसाठी 30 टँकर वापरत असल्याचे दिसून येते.
बागलाण तालुक्यात सहा गावांना ३, चांदवड तालुक्यात ३३ गावे व वाड्यांना १३, देवळा तालुक्यात १३ गावांना ६, इगतपुरी तालुक्यात ७५ गावांना १९ टँकर, मालेगाव तालुक्यात ५४ गावांना १५ टॅंकर, नांदगाव तालुक्यात १६८ गावांना २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पेठ तालुक्यात २० गावे व वाड्यांना १३, सुरगाणा तालुक्यात १३ गावे व वाड्यांना 13, सिन्नर तालुक्यात ५१ गावांना ६, त्र्यंबकेश्वर तालुक्यात २५ गावांना ५ टँकर, कळवण तालुक्यात ८ गावांना ६ टँकर, येवला तालुक्यात ११० गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.