नाशिक : ‘वेस्ट टू वंडर’ उपक्रमातून कलाकृती निर्माण करताना कलाकार.  pudhari photo
नाशिक

Waste to Wonder workshop : कलाकृतींनी शहराचा ‘आर्ट स्केप’ सजणार

भंगारातून निर्मित शिल्पांनी वाहतूक बेटे, सार्वजनिक स्थळांचा कायाकल्प

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील वाहतूक बेटे आणि सार्वजनिक ठिकाणे आता लोखंड, पत्रा, तार यांसारख्या टाकाऊ भंगारातून तयार केलेल्या टिकाऊ कलाकृतींनी सजणार आहेत. यासाठी देशभरातील सहा कलाकार सातपूर येथील कला कार्यशाळेत सर्जनशील आणि अभिनव कलाकृतींची निर्मिती करत आहेत.

इंडेक्स आर्ट गॅलरी आणि नाशिक महापालिकेच्या सहकार्याने सातपूर येथे ‘वेस्ट टू वंडर’ ही अनोखी कार्यशाळा सुरू झाली आहे. इंडेक्स आर्ट गॅलरीच्या आरती पंचाक्षरी यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा होत आहे. पंधरा दिवस चालणार्‍या या कार्यशाळेत देशभरातील सात कलाकार सहभागी झाले आहेत. हे कलाकार टाकाऊ साहित्याचा वापर करून आकर्षक व सर्जनशील कलाकृती तयार करत आहेत.

या कलाकृती शहरातील वाहतूक बेटे तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. या उपक्रमातून नाशिक शहराची ‘सिटी स्केप’ कला-नगरीत परिवर्तीत होणार असून, पर्यावरणपूरक संदेशासह शहरी सौंदर्यात भर पडणार आहे.

भंगार, धातूच्या पट्ट्या, तारा शिल्पकारांच्या कल्पक हातात नवजीवन घेत आहेत. कुंभथॉन इनोव्हेशन फाउंडेशनने सातपूर येथील आपल्या स्टुडिओची जागा या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिली आहे. देशभरातून आलेले सात शिल्पकार टाकाऊ साहित्याला कलात्मक आकार देत आहेत. किरण इंगळे आणि इंडेक्सची टीम याचे व्यवस्थापन बघत आहे.

अभिषेक साळवे, जतिन जयाकुमार, शुभम मिश्रा जुई अहिरे, नेहा बंगळूरकर, ओमकार रेडगावकर, गौरव महाजन हे आर्टिस्ट सहभागी आहेत. तयार झालेली शिल्पे वाहतूक बेटांवर प्रस्थापित करण्यात येणार असून, त्यामुळे नाशिकचे ‘आर्ट स्केप’ अधिक आकर्षक आणि समृद्ध होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

वेस्ट टू वंडर उपक्रमातून टाकाऊतून टिकाऊ कलाकृती शहराची कलारेषा रुंदवणार आहेत. यातून पर्यावरणपूरक संदेश जाण्यासह शहराचा सांस्कृतिक स्केपही बदलणार आहे.
आरती पंचाक्षरी, संकल्पना, वेस्ट टू वंडर
हे केवळ कला शिबिर नाही, तर ही पर्यावरणाची जाणीव आहे. खरं तर कचरा नसतोच. टाकाऊ कचर्‍याचे कायाकल्प करून निर्मिती करता येतेच. निसर्ग स्वतःला जसा नव्याने उभा करतो, तसेच कलाकारसुद्धा तुटलेल्या गोष्टींना नवी कहाणी देतात. कला, पर्यावरण, समाज व जबाबदारी यांना एकत्र करून नाशिकचे ब्रॅण्डिंग करायचे आहे.
रुचिर पंचाक्षरी, संयोजक, वेस्ट टू वंडर उपक्रम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT