नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजपने आतापर्यंत कधीही काँग्रेसप्रमाणे सत्तेसाठी निवडणूक लढविली नाही. राहुल गांधी व शरद पवार यांच्या कंपनीने मोहब्बतच्या दुकानाच्या नावाखाली खोट्याचे दुकान लावले. तीन तलाक, काश्मीरमधील ३७० कलम हटविणे यासारखे महत्त्वाचे निर्णय भाजपच्या सत्ता काळात झाले. आता वक्फ बोर्ड कायदा रद्द (Waqf Board) केल्याशिवाय राहणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी स्पष्ट केले.
शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच काँग्रेसचे बूथस्तरावरील कार्यकर्ते फोडून ते भाजपला जोडा. 'मविआ'चा पायाच आता नेस्तनाबूत करा आणि निवडणुका जिंका, असा कानमंत्रही अमित शहा यांनी दिला. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना १५ कलमी कार्यक्रम दिला. भाजप उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता संवाद बैठक बुधवारी सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे पार पडली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मूलमंत्र देताना शहा बोलत होते.
राज्यात महायुती सरकार आणण्यासाठी फोडोफोडीचा मंत्र अंमलात आणावाच लागेल, असे ठामपणे सांगताना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याने भाजपचे काहीही बिघडणार नसल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.
भाजपचे स्वास्थ्य चांगले असल्याने सर्व काही पचनी पडेल, राज्यात बहुमताने महायुतीची सत्ता येईल, असा दावाही शहा यांनी केला. महाराष्ट्रातील निवडणूक जिंकल्यानंतर २०२९ मधील लोकसभा निवडणुकीत तीनशेच्या पार खासदारांचा आकडा जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रात सलग तिसऱ्यांदा आलेले मोदी सरकार वक्फ बोर्डाचा कायदा रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी व पक्षाच्या वैचारिक लढाईला नवा आयाम देणारी आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपयश आले. भाजपने या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. जागांची संख्या घटली असली, तरी आपण सलग तिसऱ्यांदा लोकसभेत सत्ताधारी बाकावर बसलो. त्यामुळे या यशाकडे बघून कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीविषयी मनात तिळमात्र शंका आणू नये. निराश होऊ नये. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे यांचीही भाषणे झाली.
भाजपचा उमेदवार पाडणे म्हणजे काँग्रेस व विरोधी पक्षांचा उमेदवार निवडून आणणे. त्यामुळे आपसातील भांडणे मिटवा, मनभेद-मतभेद दूर सारून एकसंधपणे कामाला लागा, अशा शब्दांत शहा यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. दोघांच्या वादामुळे उमेदवारी मिळणार नाही. परंतु, पक्षाचे वातावरण मात्र खराब होईल. तुमचे तिकीट देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे कापू शकत नाहीत; तर पक्षच कापू शकतो. त्यामुळे पक्षामुळेच उमेदवारी मिळेल असे सांगत, जो उमेदवारी मागेल त्याला उमेदवारी मिळणार नाही, जो मागणार नाही आणि केवळ पक्षाचे काम करेल त्यालाच उमेदवारी मिळेल, अशा शब्दांत शहा यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.