वणी (नाशिक) : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन कु. यज्ञा दुसाने या चिमुरडीवर नराधमाने केलेल्या बलात्कारानंतर केलेल्या निर्घुण हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी वणी शहरात बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) सकाळी संताजी चौक ते वणी पोलीस स्टेशन असा प्रचंड निषेध मोर्चा काढण्यात आला. सुवर्ण सोनार समाज, वणी ग्रामपंचायत, संयुक्त जयंती कमिटी आणि वणीतील सर्व समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले.
या मोर्चाची सुरुवात बुधवार (दि.19) रोजी सकाळी १० वाजता संताजी चौकातून झाली. “अशा नराधमाला फाशी झालीच पाहिजे", “पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे”, “खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा” अशा घोषणा देत नागरिकांनी पोलीस स्टेशनपर्यंत संतप्तपणे मोर्चा काढला. पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. निवेदनात आरोपीविरुद्धचा खटला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
कृऊबा समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “अशा हैवानाला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून भर चौकात फाशी द्यावी. भविष्यात कुणीही असा अत्याचार करण्याची हिंमत करू नये आणि पीडित कुटुंबाला खरा न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे.”
मोर्चाचे नेतृत्व सुवर्णाकार (सोनार) समाजाचे अध्यक्ष संजय खरोटे, उपाध्यक्ष गणेश बाविस्कर, कार्याध्यक्ष सुमित वडनेरे, सचिव अक्षय सोनवणे, नरेंद्र वडनेरे, चंद्रकांत सोनवणे, राजेंद्र जाधव, नाना रणधीर, चंद्रकांत रणधीर, नाना अहिरराव, जयेश जाधव, अशोक दुसाने, सुरेश वर्मा, योगेश दुसाने, हेमंत वडनेरे यांनी केले. याशिवाय सरपंच मधुकर कड, उपसरपंच विलास कड, कृऊबा सभापती प्रशांत आप्पा कड, बाळासाहेब घडवजे, बाळासाहेब गायकवाड, प्रतिष्ठित व्यापारी महेंद्र पारख, प्रविण बोरा यांच्यासह वणीतील विविध समाजातील शेकडो तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण वणी परिसरात रोषाची लाट उसळली असून, आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी नागरिक करीत आहेत.