नाशिक : आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, असे आश्वासन दिल्याचे माझ्या कधी ऐकण्यात आले नाही. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे हा माझा विषय नाही.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून हात झटकले आहेत. कृषिमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
गत विधानसभा निवडणुकीतील वचननाम्यात कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारमधील अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करता येणार नसून, शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फसवणूक झाल्याची भावना असून, या मुद्द्यावरून विराेधकांनी आता सरकारला धारेवर धरले आहे.
यासंदर्भात ॲड. कोकाटे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी हा विषय माझ्या स्तरावरचा नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. आम्ही कर्जमाफी करू, असे माझ्या कधी ऐकण्यात आले नाही, असे सांगत कोकाटेंनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सारवासारव केली आहे. राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसानभरपाई मिळणार आहे. विधिमंडळ अधिवेशन शेतकऱ्यांना विम्याची नुकसानभरपाई मिळाली नाही याबाबत लक्षवेधी लावली होती. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी नुकसानभरपाई मिळेल असे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार अर्थमंत्री पवार यांनी २,५५५ कोटी रक्कम विमा कंपन्यांना वर्ग केली असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वर्ग होतील, असेही मंत्री कोकाटे यांनी सांगितले. राज्यातल्या महापुरुषांवर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. महापुरुषांबाबत कोणीही अकलेचे तारे तोडू नये, असा सल्ला देताना, यासंदर्भात कठोर कायदा व्हावा, या छत्रपती उदयनराजे यांच्या मागणीशी आपण सहमत असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
दिंडोरीतील कंपनीने बेकायदेशीररीत्या युरिया घेतल्याप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून, पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कोकाटे यांनी दिली. राज्य सरकारने सोयाबीन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. अधिकचे खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केंद्राने मान्य केल्याचा दावा ॲड. कोकाटे यांनी केला आहे.