नाशिकरोड : प्रफुल्ल पवार
नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकांमध्ये नाशिकरोड येथील प्रभाग 17 ते 19 मधील ‘नोटा’ या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र समोर आले. अनेक प्रभागांमध्ये ‘नोटा’ला मिळालेली मते ही काही उमेदवारांपेक्षा अधिक असल्यामुळे ही केवळ आकडेवारी न राहाता, मतदारांमधील वाढती राजकीय उदासीनता आणि नाराजी स्पष्टपणे अधोरेखित करणारी ठरली आहे.
लोकशाही प्रक्रियेत सहभागी राहूनही उपलब्ध उमेदवारांवर विश्वास नसल्याची भावना मतदारांनी ‘नोटा’द्वारे व्यक्त केली आहे. ‘मतदान न करणे’ आणि ‘निवड मान्य नसणे’ यामधील स्पष्ट फरक दाखविणारा ‘नोटा’ हा पर्याय सजग मतदारांचे प्रभावी शस्त्र ठरत असल्याचे या निवडणुकीतून दिसून आले.
प्रभाग 17 (अ)मध्ये तब्बल 15 उमेदवार रिंगणात असतानाही ‘नोटा’ला 534 मते मिळाली. विशेष म्हणजे केवळ 5 उमेदवारांनाच ‘नोटा’पेक्षा अधिक मते मिळाली, तर उर्वरित 9 उमेदवार ‘नोटा’च्या मागे राहिले. यात अपक्षांसह पक्षीय उमेदवारांचाही समावेश आहे. यावरून मतदारांचा उमेदवारांवरील अविश्वास स्पष्ट दिसून येतो.
प्रभाग 18 आणि 19 मध्येही अशीच परिस्थिती दिसून आली. काही ठिकाणी ‘नोटा’ने थेट उमेदवारांना मागे टाकले, तर काही ठिकाणी अत्यल्प फरकाने उमेदवार वाचले. त्यामुळे कोणालाच पसंती नाही ही भावना केवळ चर्चेपुरती न राहाता, मतपेटीत उतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राजकीय पक्षांनी उमेदवार निवडताना केवळ समीकरणे, जाती-धर्माची गणिते किंवा अंतर्गत दबाव न पाहता स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता या निकषांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज यामुळे दिसून येत आहे. कारण ‘नोटा’ म्हणजे निष्क्रियता नव्हे, तर सजग, जबाबदार आणि लोकशाही मूल्यांची जाणीव असलेले मत आहे. ‘नोटा’ला मिळणारी वाढती मते ही पक्षांसाठी धोक्याची घंटा असून, आगामी निवडणुकांमध्ये मतदारांचा विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी आत्मपरीक्षण आणि परिवर्तन अपरिहार्य ठरणार आहे.